जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावर दिसून येत असून, शनिवारी 24 जानेवारी रोजी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ बघायला मिळाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी चांदीच्या दराने हनुमान उडी मारली असून किलो मागे तब्बल 15,700 रुपयांची वाढ बघायला मिळाली आहे. सोन्याच्या दरातही प्रति 10 ग्रॅममागे 500 रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरातील वाढ (Gold Rate Today)
नागपूर सराफा बाजाराने प्रसिद्ध केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट (99.5 टक्के शुद्धता) 10 ग्रॅम सोन्याचा विक्री दर शनिवारी 1,57,600 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी हा दर 1,57,100 रुपये होता. त्याचप्रमाणे, दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा दर शनिवारी 1,46,600 रुपये झाला आहे, जो शुक्रवारी 1,46,100 रुपये होता.
नक्की वाचा: स्मृती मंधानाच्या मित्राने सांगितलं पलाशसोबतचं लग्न मोडण्याचं खरं कारण
चांदीची मोठी भरारी (Silver Rate Today)
चांदी दररोज महाग होत चालली असून शनिवारीही चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी चांदीचा विक्री दर 3,23,200 रुपये प्रतिकिलो होता. मात्र, शनिवारी या दरात 15,700 रुपयांची वाढ होऊन तो 3,38,900 रुपयांवर पोहोचला आहे. दागिन्यांसाठी चांदीचा दरही 3,20,000 रुपयांवरून 3,35,500 रुपये झाला आहे. सराफा बाजाराने स्पष्ट केले आहे की, वर दिलेले दर हे केवळ सोन्या-चांदीचे मूळ दर आहेत. दागिने खरेदी करताना त्यावर जीएसटी (GST), हॉलमार्किंग शुल्क आणि किमान १३ टक्के किंवा त्याहून अधिक मेकिंग चार्जेस (घडणावळ) अतिरिक्त आकारले जातील. त्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना ग्राहकांना या दरांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागेल.
गुंतवणूकदारांना अजूनही संधी?
'मोतीलाल ओसवाल'च्या कमॉडीटीज विभागाचे हेड ऑफ रिसर्च नवनीत दमानी यांनी म्हटलंय की, सोने आणि चांदीच्या दरवाढीबद्दल बाजारा सकारात्मक दिसतो आहे. औद्योगिक पातळीवर मागणी वाढली असल्याने आणि मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे चांदीचे दर वाढत चालले असून येणाऱ्या काळातही गुंतवणूकदारांना चांदीमुळे चांगला परतावा मिळताना दिसू शकतो. चांदीच्या दरांमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली असून कमी कालावधीच्या टप्प्यात चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळू शकतात असेही दमानी यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: पाकिस्तानपण टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार?
चांदीपेक्षा सोन्यात गुंतवणूक फायद्याची ?
मोतीलाल ओसवालने प्रसिद्ध केलेल्या आपल्या एका अहवालात म्हटले आहे की चांदीच्या तुलनेत सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे सद्यस्थितीत अधिक फायदेशीर ठरेल. चांदीचे सध्याचे भाव पाहाता, चांदीच्या दरांमध्ये एक मोठी घसरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज मोतीलाल ओसवाल या संस्थेने वर्तवला आहे.