देशभरात 22 सप्टेंबरपासून नवीन ‘जीएसटी 2.0' प्रणाली लागू झाली आहे, ज्यामुळे अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहेत. 2017 नंतरचा हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. यामध्ये आता चारऐवजी फक्त दोन मुख्य कर स्लॅब 5% आणि 18% आहेत, तर लक्झरी आणि ‘सिन' वस्तूंवर 40% कर कायम ठेवण्यात आला आहे. या बदलांमुळे अनेक घरगुती आणि दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्या आहेत, पण एलपीजी सिलेंडरच्या किमतीत काही बदल झाला आहे का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार का?
नवीन जीएसटी सुधारणेमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, घरगुती वापराच्या सिलेंडरवर पूर्वीप्रमाणेच 5% जीएसटी लागेल. तसेच, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल सिलेंडरवरही 18% जीएसटी लागू राहील. त्यामुळे 22 सप्टेंबरपासून एलपीजीच्या किमतीत कोणतीही कपात झालेली नाही. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नसला तरी, अनेक महत्त्वाच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
(नक्की वाचा : New GST Rates: आता विमा पॉलिसीवर 0% जीएसटी; ‘या' तारखेपासून घेतला तरच होईल फायदा, जाणून घ्या सर्वकाही )
तूप, पनीर, लोणी, आईस्क्रीम, जॅम, लोणचे आणि ड्रायफ्रूट्स यांसारखे अनेक खाद्यपदार्थ आता स्वस्त झाले आहेत. अनेक एफएमसीजी कंपन्यांनी किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्स, कार, एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनसारख्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- GST Rate Cut Complain: जीएसटी कपातीनंतरही वस्तू स्वस्त मिळत नाहीत? कुठे आणि कशी करायची तक्रार,वाचा सविस्तर)
हेल्थकेअर (Healthcare) क्षेत्रातही मोठा दिलासा मिळाला आहे. औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील कर 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक वस्तू आणि सेवाही आता स्वस्त झाल्या आहेत. एकंदरीत, जरी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली नसली तरी, नवीन जीएसटी प्रणालीमुळे अनेक दैनंदिन आणि आवश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.