भारतीय उद्योगपती गौतम अदाणी आणि त्यांच्या कंपनींना टार्गेट करणारी अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चचे (Hindenburg Research) दुकान कायमचे बंद होणार आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी याबाबची घोषणा केली आहे. एक्स माध्यमावर पोस्ट करत त्यांनी कंपनी बंद करत असल्याचं सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. भाजप प्रवक्ता शहजाद पुनावाला ( BJP Spokesperson Shehzad Punawala Big Statement) यांनी या सर्व प्रकरणानंतर राहुल गांधींना खडे बोल सुनावले. राहुल गांधी आणि काँग्रेसने देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. यावेळी पुनावाला म्हणाले, हिंडेनबर्ग सुपारी घेऊन भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या आणि वैयक्तिक फायदा करून घेण्याच्या हेतूने काम करीत होती. मात्र हिंडेनबर्गचा वापर भारतीय राजकारण्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतला. हिंडेनबर्गवर अमेरिकेतही तपास सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हिंडेनबर्गला त्यांच्या रिचर्स पेपरवरुन फटकारलं होतं. याशिवाय हिंडेनबर्गच्या कामाची तपासणी होणं गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं. हिंडेनबर्गने भारतीय गुंतवणुकदारांचं कोट्यवधींचं नुकसान केल्याचंही ते यावेळी म्हणाले.
नक्की वाचा - Hindenburg Research Shutting Down: हिंडेनबर्ग रिसर्चला कायमचा टाळा; कंपनीच्या मालकांकडून मोठी घोषणा
मात्र राहुल गांधी एका व्यक्ती, एका पार्टीविरोधात बोलत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात उतरले आणि आपले परदेशी भागीदार हिंडेनबर्गची मदत घेत खोटे आरोप लावत होते. भारताच्या अर्थव्यवस्थेत गोंधळ किंवा अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र आता हिंडेनबर्गचं दुकान बंद झालं आहे. या प्रकरणात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही राहुल गांधींना समर्थन दिलं नव्हतं. मात्र तरीही राहुल गांधी कोणाच्या इशारावर हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा दाखला देत होते? हे कोणाच्या इशाऱ्यावर सुरू होतं? असा सवाल शहजाद पुनावाला यांनी व्यक्त केला आहे. पक्षाने माफी मागायला हवी आणि काँग्रेसचं हिंडेनबर्गसोबत काय नातं होतं हे देखील स्पष्ट करायला हवं. भारतातील ज्या गुंतवणुकदारांना नुकसान झाला त्यांची राहुल गांधी माफी मागणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.