तुम्ही गाडी खरेदी केली, मात्र त्याचा आर्थिक अंदाज घेतला होता का? आज सर्रास गाडी खरेदी केली जाते. ईएमआयमुळे १० लाखांची गाडी सहज घेतली जाते. मात्र स्वतंत्र आर्थिक सल्लागार एसव्ही वरुण यांनी याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. ते म्हणाले, बँकेकडून मिळणाऱ्या लोनमुळे अनेकजण गाडी खरेदी करतात. मात्र गाडी खरेदी केल्यानंतर दरमहिन्याचा वाढलेला खर्च पाहून चिंता वाढते. इएमआय कागदावर सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात खर्च वाढत जातो.
काय आहे गणित?
10 लाखांची कार खरेदी केल्यावर पाच वर्षांचं लोन आणि १० टक्के व्याज लावले तर EMI 21,250. मात्र खेळ इथं संपत नाही. इन्शुरन्सचा खर्च, पेट्रोलचा खर्च, मेन्टेनन्स खर्च, टोल आणि पार्किंगचा खर्च.
EMI- 21,250 रुपये
विमा- 3,000 रुपये
पेट्रोल- 6,000 रुपये
मेन्टेनन्स- 2,000 रुपये
टोल, पार्किंग आणि छोटा-मोठा खर्च- 1,500 रुपये
याचं एकूण बिल झालं ३३,७५० रुपये, म्हणजे साधारण ३४ हजार रुपये खर्च दर महिन्याला त्या गाडीच्या खरेदीसाठी होतो.
आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया...
जर तुम्ही ४० हजार रुपये कमाई करीत असाल तर ८५ टक्के पगार केवळ गाडीत जातो. जर तुमचा पगार ८० हजार असेल तर तुमच्या पगाराचा ५५ टक्के भाग केवळ गाडीमध्ये खर्च होतो.
दरमहा १ लाख रुपये कमावल्यानंतरही, तुम्ही त्यातील ४२ टक्के तुमच्या गाडीवर खर्च करत आहात. तुम्ही आजारी पडलात किंवा काही आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली तर खर्च अधिक वाढतो आणि वेळेप्रसंगी उधार घेण्याची वेळ येते.
खरा प्रश्न काय आहे?
वरील परिस्थिती पाहता खरा प्रश्न तुम्ही गाडी खरेदी करू शकता की नाही हा नाही तर तुम्ही गाडी झेलू शकता का असा आहे. गाडी खरेदी करून तुम्ही तुमची बचत आणि शांतता गमावून बसाल. गाडी खरेदी करणं आता शोऑफपेक्षाही जास्त भावनिक बाब झाली आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्ही गाडी खरेदी करायला शोरुममध्ये पाऊल ठेवाल तेव्हा स्वत:ला विचारा, मी गाडी खरेदी करीत आहे की हळूहळू आर्थिकदृष्ट्या खोल गर्तेत जाण्याचा प्लान करतोय.