जाहिरात

रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संघटनेवर मराठी मोहर! 25 वर्षांहून अधिक अनुभवाचा सन्मान

. देशातील आघाडीची संस्था असलेल्या इंडियन REITs असोसिएशनच्या म्हणजेच आयआरएच्या अध्यक्षपदी शिरीष गोडबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संघटनेवर मराठी मोहर! 25 वर्षांहून अधिक अनुभवाचा सन्मान
मुंबई:

देशातील रिअल इस्टेट क्षेत्राचे नियंत्रण आणि विकास करणाऱ्या आर्थिक जगतातून मराठी माणसाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. देशातील आघाडीची संस्था असलेल्या इंडियन REITs असोसिएशनच्या म्हणजेच आयआरएच्या अध्यक्षपदी शिरीष गोडबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका मराठी व्यक्तीकडे देशातील या सर्वोच्च आर्थिक संघटनेच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आल्यामुळे संपूर्ण रिअल इस्टेट आणि वित्तीय क्षेत्रात सध्या गोडबोले यांचे कौतुक होत आहे. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

आलोक अग्रवाल यांच्या जागेवर नियुक्ती

ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर आलोक अग्रवाल यांनी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सोडलेल्या या सर्वोच्च पदावर आता शिरीष गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. आलोक अग्रवाल यांनी आपल्या कार्यकाळात भारतातील या क्षेत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिलेले योगदान आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढवलेली जागरूकता याबद्दल असोसिएशनने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

कोण आहेत शिरीष गोडबोले?

शिरीष गोडबोले हे सध्या नॉलेज रिअ‍ॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. बाजार भांडवलाचा विचार केला तर ही भारतातील सर्वात मोठी रीट संस्था आहे. गोडबोले यांना जागतिक स्तरावर स्थावर मालमत्ता गुंतवणूक आणि वित्त क्षेत्रात तब्बल 25 वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी न्यूयॉर्कस्थित मॉर्गन स्टॅन्लेच्या रिअल इस्टेट ॲसेट्स विभागात व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे. 

( नक्की वाचा : पुन्हा नोटाबंदी होणार की काय? 10, 20, 50, 100 रुपयांच्या जुन्या नोटांबाबत बँक ऑफ महाराष्ट्रनं दिली मोठी माहिती )

याशिवाय गोल्डमन सॅक्स इंडियाच्या मर्चंट बँकिंग विभागात आणि बोस्टन येथील एइडब्ल्यू कॅपिटल मॅनेजमेंट अशा अनेक जागतिक दर्जाच्या नामांकित संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. गोडबोले यांनी बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन म्हणजेच एमबीए विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

आपल्या या नियुक्तीबाबत बोलताना शिरीष गोडबोले म्हणाले की, या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर इंडियन REITs असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्राने विश्वासार्ह आणि पारदर्शक गुंतवणूक पर्याय म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुढील काळातील संधी याहून अधिक चांगल्या आहेत कारण देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी ही एक मुख्य प्रवाहातील गुंतवणूक संकल्पना बनत आहे. सर्वोच्च दर्जाचे सुशासन आणि पारदर्शकता कायम ठेवून उद्योगाच्या पुढील विकासासाठी आपण सर्व सदस्यांसोबत मिळून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे ही इंडियन REITs असोसिएशन

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 2023 मध्ये इंडियन REITs असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. ही एक ना-नफा तत्त्वावर कार्य करणारी देशातील प्रमुख उद्योग संघटना आहे. भारतातील रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट क्षेत्राच्या विकासाला चालना देणे आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. या संघटनेमध्ये ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट, एम्बसी ऑफिस पार्क्स, माइंडस्पेस बिझनेस पार्क्स, नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट, नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट आणि बागमाने प्राइम ऑफिस यांसारख्या देशातील मोठ्या संस्थांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com