INOX's Siddharth Jain Buy Tesla Car : टेस्लाने भारतात प्रवेश केल्यानंतर आता टेस्ला कारची डिलिव्हरी सुरू झाली आहे. आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी ‘इंडिया इन्क'ची पहिली टेस्ला कार खरेदी केल्याचा दावा केला आहे. त्यांनी ‘एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली टेस्ला कारसोबतचा फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला.
सिद्धार्थ जैन यांनी ट्वीट करत म्हटलं की, "ही कार तुझ्यासाठी, इलॉन मस्क! भारताच्या कॉर्पोरेट जगतातील (India Inc) पहिली टेस्ला कार मिळाल्याने मी खूप रोमांचित झालो आहे. 2017 मध्ये टेस्ला फ्रेमोंट कारखान्याला भेट दिल्यापासून मी या क्षणाची वाट पाहत होतो!"
टेस्ला कारची किंमत
टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये आपला पहिलं शोरूम उघडून भारतात अधिकृत प्रवेश केला. या शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी टेस्ला मॉडेल वाय भारतात सादर करण्यात आली.
या कारच्या किंमती 61 लाख रुपयांपासून सुरू होतात, असे कंपनीच्या वेबसाइटवरील कॅटलॉगमध्ये नमूद आहे. रियर-व्हील ड्राइव्ह मॉडेलची किंमत 59.89 लाख रुपये आणि लाँग रेंज रियर-व्हील ड्राइव्हची किंमत 67.89 लाख रुपये आहे.
टेस्लाने 22 जुलैपासून भारतात ऑनलाइन बुकिंग सुरू केली आहे, ज्यात दिल्ली, पुणे, मुंबई आणि गुरुग्राम या चार प्रमुख शहरांना प्राधान्य दिले जात आहे. 8 ऑगस्ट रोजी, टेस्लाने दिल्लीच्या एरोसिटी येथे 17.22 लाख रुपये प्रति महिना भाड्याने 8,200 स्क्वेअर फूट व्यावसायिक जागा घेतली आहे, अशी माहिती रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म ‘सीआरई मॅट्रिक्स'ने दिली.