Job Exit Rules: नोकरी सोडताय? मग ही बातमी वाचाच! 1 एप्रिलपासून बदललेत नियम, तुमचा होणार मोठा फायदा!

New Labour Codes 2026: तुमच्या पगाराची पावती, खिशात येणारी रोख रक्कम आणि नोकरी सोडल्यानंतर मिळणारे पैसे... या सर्व गोष्टींमध्ये येत्या 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:


New Labour Codes 2026: तुमच्या पगाराची पावती, खिशात येणारी रोख रक्कम आणि नोकरी सोडल्यानंतर मिळणारे पैसे... या सर्व गोष्टींमध्ये येत्या 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार आहेत. तुम्हाला मिळणारा पगार तेच राहणार असला तरी, त्याचे गणित मात्र पूर्णपणे बदलणार आहे. भारत सरकारचे नवे कामगार कायदे आणि प्राप्तिकर कायदा (Income Tax Act) लागू होणार असल्याने, नोकरी करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हे बदल समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या बदलांमुळे सुरुवातीला तुमच्या हातात येणारा पगार थोडा कमी वाटू शकतो, पण तुमच्या भविष्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

पगाराच्या पावतीचे गणित आता बदलणार

आतापर्यंत अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार (Basic Salary) कमी ठेवून इतर भत्ते (Allowances) जास्त द्यायच्या. यामुळे कंपन्यांना पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटीमध्ये कमी पैसे भरावे लागायचे. मात्र, 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या 'कोड ऑन वेजेस 2019' नुसार, आता कोणत्याही कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा त्याच्या एकूण पगाराच्या (CTC) किमान 50 टक्के असणे अनिवार्य आहे. 

Advertisement

म्हणजेच, जर तुमचा एकूण पगार 50,000 रुपये असेल, तर त्यातील किमान 25,000 रुपये हा तुमचा मूळ पगार असावा लागेल. हा नियम छोट्या स्टार्टअपपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांना लागू असेल.

( नक्की वाचा : Honest Woman: प्रामाणिकपणाचा आदर्श! खात्यात आले 10 कोटी रुपये, तरीही डगमगलं नाही मन; महिलेची सर्वत्र चर्चा )

हातात येणारा पगार कमी, पण भविष्य होणार सुरक्षित

मूळ पगार वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्या पीएफ योगदानावर होईल. पीएफ आणि ग्रॅच्युइटीची गणना मूळ पगारावर केली जाते, त्यामुळे आता तुमच्या पगारातून पीएफसाठी कापली जाणारी रक्कम वाढेल. यामुळे दरमहा तुमच्या हातात येणारा पगार (Take-home Pay) सुरुवातीला थोडा कमी होऊ शकतो. 

मात्र, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला विचार केला तर, तुमच्या निवृत्तीच्या वेळी मिळणारी पुंजी (Retirement Corpus) खूप मोठी असेल. तसेच नोकरी सोडताना मिळणारी ग्रॅच्युइटीची रक्कमही आता पूर्वीपेक्षा जास्त मिळणार आहे.

( नक्की वाचा : New COVID: कोरोनाचं रूप बदललं! BA.3.2 चा जगभर धुमाकूळ; ताप, खोकला की आणखी काही? नवी लक्षणं आली समोर )

नोकरी सोडल्यानंतर केवळ दोन दिवसांत हिशोब पूर्ण

नोकरी बदलणाऱ्या किंवा सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासादायक बदल म्हणजे 'फुल अँड फायनल' (F&F) सेटलमेंटचा कालावधी. आतापर्यंत नोकरी सोडल्यानंतर पगाराचे उरलेले पैसे किंवा इतर थकीत रक्कम मिळण्यासाठी 30 ते 90 दिवस वाट पाहावी लागायची. 

Advertisement

पण नव्या नियमानुसार, कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असो किंवा त्याला कामावरून काढले असो, कंपनीला त्याचा सर्व हिशोब आणि थकीत पगार शेवटच्या कामकाजाच्या दिवसापासून केवळ 2 कार्यालयीन दिवसांच्या आत (Two Working Days) पूर्ण करावा लागेल. यात उशीर करणे हा आता कायदेशीर गुन्हा ठरणार आहे.

65 वर्षांनंतर प्राप्तिकर कायद्याची 'रिटायरमेंट'

भारतात गेल्या 6 दशकांपासून लागू असलेला 1961 चा प्राप्तिकर कायदा आता इतिहास जमा होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून त्याची जागा 'प्राप्तिकर कायदा 2025' घेणार आहे. या नव्या कायद्यात टॅक्सचे दर किंवा सवलतींमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत, तर कायद्याची भाषा अत्यंत सोपी करण्यात आली आहे. 

Advertisement

तब्बल 819 कलमे असलेला जुना गुंतागुंतीचा कायदा आता केवळ 536 कलमांमध्ये बसवण्यात आला आहे. सामान्य करदात्याला कोणताही तज्ज्ञ न नेमला तरी आपला टॅक्स स्वतः समजावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी

1 एप्रिल 2026 पासून होणारे हे बदल नवीन आर्थिक वर्षासाठी लागू होतील. 31 मार्च 2026 पर्यंत कमावलेल्या उत्पन्नावर जुनाच कायदा लागू राहील. तसेच, नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसांत पगार मिळण्याचा नियम असला तरी, ग्रॅच्युइटी आणि पीएफ ट्रान्सफरसाठी असणारे जुने नियम आणि त्यांचा कालावधी कायम राहणार आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात आपल्या पगाराचे नियोजन करताना हे बदल लक्षात घेणे प्रत्येक नोकरदारासाठी फायद्याचे ठरेल.

Topics mentioned in this article