10 Crore in Bank Account: एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाले तर काय होईल? स्वप्नातही न विचार केलेली एवढी मोठी रक्कम डोळ्यासमोर दिसताच कोणाचेही भान हरपू शकते. पण एका महिलेच्या बाबतीत जेव्हा असाच काहीसा प्रकार घडला, तेव्हा तिने जे पाऊल उचलले ते पाहून संपूर्ण प्रशासन आणि बँकिंग क्षेत्र अवाक झाले आहे. अत्यंत साध्या परिस्थितीत जगणाऱ्या या महिलेच्या खात्यात अचानक तब्बल 10 कोटी रुपये जमा झाले, मात्र या रकमेला स्पर्शही न करता तिने दाखवलेली प्रामाणिकता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
नेमकं काय घडलं?
ही थक्क करणारी घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील बिछवां परिसरात घडली आहे. येथील देवगंज गावातील रहिवासी रीता या त्यांच्या नवऱ्यासोबत शेती करून उदरनिर्वाह करतात. नवरात्रीच्या अष्टमीचा दिवस होता आणि रीता काही पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. काही कारणास्तव बँकेतून पैसे निघू शकले नाहीत, म्हणून त्यांनी जवळच्याच एटीएमचा आधार घेतला.
( नक्की वाचा : New COVID: कोरोनाचं रूप बदललं! BA.3.2 चा जगभर धुमाकूळ; ताप, खोकला की आणखी काही? नवी लक्षणं आली समोर )
एटीएममध्ये बँक बॅलन्स चेक करताच रीता यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या खात्यात चक्क 9 कोटी 99 लाख 49 हजार 588 रुपये दिसत होते. आकडा इतका मोठा होता की सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.
दुसऱ्यांदा खात्री केली आणि व्हिडिओ बनवला
आपली काहीतरी चूक होत असावी असे वाटल्याने रीता यांनी पुन्हा एकदा बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर जाऊन आपला बॅलन्स चेक केला. मात्र दुसऱ्यांदाही स्क्रीनवर तीच प्रचंड मोठी रक्कम दिसत होती. या अजब प्रकाराची खात्री पटल्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
( नक्की वाचा : Akola News: 138 वर्षांची परंपरा बदलली! अकोल्यातील सिदाजी महाराज यात्रेत भाविकांनी काय केलं? )
एका सामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेच्या खात्यात अचानक एवढी मोठी रक्कम कोठून आली, हे कोणालाही उमजत नव्हते. मात्र यावेळी रीता यांनी दाखवलेला संयम आणि प्रामाणिकता खरोखरच कौतुकास्पद ठरली.
प्रामाणिकपणाचा आदर्श आणि कुटुंबाला ताकीद
एवढी मोठी रक्कम खात्यात असूनही रीता यांनी त्यातील एकही रुपया काढण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही स्पष्ट शब्दांत बजावले की, जोपर्यंत या पैशांचा नेमका स्रोत समजत नाही, तोपर्यंत याला हात लावायचा नाही. ज्याचे हे पैसे असतील त्यांनी ते घेऊन जावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. हा सर्व प्रकार समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आणि लोकांनी या महिलेच्या प्रामाणिकपणाचे तोंडभरून कौतुक सुरू केले.
बँक व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी जेव्हा रीता आणि त्यांचे कुटुंबीय बँकेत पोहोचले, तेव्हा सुट्टी असल्यामुळे बँक बंद होती. मात्र बँक ऑफ इंडियाच्या करीमगंज शाखेचे व्यवस्थापक ऋषिकांत पांडे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, तांत्रिक बिघाड किंवा ट्रान्झॅक्शनमधील चुकीमुळे असे घडू शकते. बँक उघडल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि संबंधित तांत्रिक अडचण दूर केली जाईल. सध्या तरी ही महिला आणि तिच्या खात्यातील ते 10 कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यात कुतूहलाचा विषय बनले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world