भपकेबाजपणा, शायनिंग मारण्यासाठी उतावीळ तरुणाई म्युच्यअल फंडातील (Mutual Fund Investment) आपली गुंतवणूक मोडताना दिसत आहे. एका पठ्ठ्याने तर कोल्डप्लेची तिकिटे (Coldplay Mumbai Concert Ticket) खरेदी करण्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोडली आहे. या माणसाने कोल्ड प्लेची तिकिटे विकत घेता यावीत यासाठी म्युच्युअल फंडातून दोन ते सव्वा दोन लाख रुपये काढले. पैसे हातात असूनही या माणसाला कोल्ड प्लेची तिकिटे मिळाली नाही. यामुळे आता त्याने रिसेलरकडून किंवा काळ्या बाजारातून अधिक पैसे देऊन तिकिटे मिळवण्याचा खटाटोप सुरू केला आहे. दीड दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या माणसाच्या खात्यात ही रक्कम जमा झाली होती. ती त्याने एका झटक्यात काढून घेतले. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या तज्ज्ञ सल्लागारांनी असे करणे हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी याचा सल्ला देणाऱ्या राहुल कुलकर्णी यांनी लोकं चित्र-विचित्र कारणासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेताना दिसत असल्याचे म्हटले आहे. एका माणसाने आयफोन घेण्यासाठी त्याची म्युच्यअल फंडातील गुंतवणूक मोडली तर दुसऱ्या एकाने गाडी घेता यावी यासाठी गुंतवणूक मोडल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. काही जण घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट करता यावे यासाठी गुंतवणूक मोडताना दिसत आहेत तर काही जण फार्म हाऊस घेताना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोडताना बघितल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तुमची गुंतवणूक आणि त्यावरील परतावा याची रक्कम 1 कोटी असेल आणि तुम्ही 1 लाख रुपये काढत असाल तर हरकत नाही, मात्र 6 लाख गुंतवले असतील आणि त्यातले 5 लाख रुपये काढून घेणं हे अत्यंत चुकीचे असल्याचं राहुल कुलकर्णींचे म्हणणे आहे.
चंगळ करण्यासाठी किंवा शायनिंग मारण्यासाठी गुंतवणूक मोडण्याचा कल वाढत चालला असल्याचे निदर्शनास आले आहे असे कुलकर्णींनी म्हटले आहे. त्यांच्या परिचयातील एका तरुणाने लग्नापूर्वीची बॅचलर पार्टी दणक्यात साजरी करण्यासाठी म्युच्यअल फंडातील गुंतवणूक मोडली होती. या तरुणाला युरोपात बॅचलर पार्टी करायची होती त्यासाठी त्याने पैसा काढून घेतला होता, असे कुलकर्णी यांनी सांगितले. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढण्यासाठी 5 ते 10 वर्षांचा कालावधी जाऊ देणे गरजेचे असते. त्यानंतरही ही गुंतवणूक न मोडता ती सतत वाढवत न्यावी असा सल्ला गुंतवणूकतज्ज्ञ देत असतात. आपातकालीन स्थिती ओढावली तरच या रकमेला हात लावण्याबाबत विचार करावा असेही सल्लागार नेहमी सल्ला देत असतात.