Gold SIlver rates: गुंतवणूकदारांसाठी आणि दागिने खरेदीदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. नागपूर सराफा बाजाराने जाहीर केलेल्या ताज्या दरांनुसार, सोन्यासह चांदीच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात सोन्याचे दर सुमारे 4% तर चांदीचे दर 6% हून अधिक वाढले आहेत. कालच्या तुलनेत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅममागे 6100 रुपयांनी वधारले आहेत, तर चांदी प्रति किलो तब्बल 21,200 रुपयांनी महागली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी आली आहे. सोन्याने 1.57 लाखांचा टप्पा पार केला असून चांदी 3.29 लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकन टॅरिफ धोरणे आणि जागतिक तणाव हे या दरवाढीचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड वाढ
काल 22 जानेवारी रोजी सोने 1 लाख 51 हजार 700 रुपये होते, जे आज थेट 1 लाख 57 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीने आज अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. काल 3लाख 08 हजार 600 रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 3 लाख 29 हजार 800 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच एका दिवसात चांदी 21,200 रुपयांनी महागली आहे. दागिन्यांच्या चांदीचा दर 3,26,500 रुपये प्रति किलो आहे.
(नक्की वाचा- PF मधून पैसे काढणं झालं सोपं; केव्हा, किती वेळेस 100 % पैसे काढू शकता? उपचार-लग्न-शिक्षणाचे नियम काय आहेत?)
सोने-चांदी दरात एवढी दरवाढ का?
तज्ज्ञांच्या मते, या दरवाढीमागे काही प्रमुख जागतिक कारणे आहेत.
- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लादण्याची केलेली घोषणा आणि ग्रीनलँड प्रकरणावरून निर्माण झालेला तणाव.
- आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य घसरल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे.
- जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्या साठ्यात सोन्याची वाढ करत आहेत.
- जागतिक युद्धाची भीती आणि आर्थिक अस्थिरतेमुळे लोक शेअर बाजारापेक्षा सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानत आहेत.