Rule Change 2025: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला काही मोठे बदल होत असतात. 1 मे 2025 पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या जगण्यावर तसंच खिशावर होणार आहे. 1 मे पासून LPG सिलेंडरपासून ते रेल्वे तिकीटापर्यंतच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गॅस सिलेंडर्सची किंमत बदलणार
दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे 1 मे रोजी देखील घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर्सची किंमत बदलणार आहे. एप्रिल महिन्यात अनुदानित आणि गैर अनुदानित सिलेंडर्सच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या. तर उज्ज्वला योजनेमधून मिळणाऱ्या सिलेंडर्सची किंमत 553 रुपये आहे. या महिन्यात सिलेंडर्सची किंमत वाढली तर गॅसवर जेवण बनवणं महागणार आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.
ATM मधून पैसे काढणे महाग
तुम्ही ATM मधून नेहमी पैसे काढत असाल तर लक्षात ठेवा 1 मे 2025 पासून या नियमात देखील बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्णयानुसार प्रत्येक महिन्यातील फ्री लिमिट संपल्यानंतर पैसे काढण्यासाठी तुमच्या खिशावर जास्त ताण पडणार आहे. यापूर्वी फ्री लिमिट संपल्यानंतर ATM मधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क होते. आता 1 मे 2025 पासून हे शुल्क 23 रुपये होणार आहे.
याचाच अर्थ फ्री लिमिटनंतर एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येक वेळी तुम्हाला 2 रुपये जास्त द्यावे लागतील. तुम्ही पैसे काढण्यासाठी वारंवार एटीएम वापरत असाल तर तुमच्या खिशावर याचा परिणाम होणार आहे.
( नक्की वाचा : ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू )
रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नवे नियम
रेल्वे तिकीट बुकिंगमध्येही एक मे पासून मोठे बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार वेटिंग तिकीटच्या प्रवाशांना स्लीपर किंवा एसी कोचमधून प्रवास करता येणार नाही. तुमच्याकडे जर रेल्वेचे वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला जनरल डब्यातूनच प्रवास करावा लागेल. काही रिपोर्टनुसार रेल्वे तिकीट भाडं आणि रिफंड चार्ज वाढवण्याचाही विचार करत आहे. तसं झालं तर रेल्वेनं प्रवास करणे आणखी महाग होऊ शकते.
फिक्स डिपॉझिटवरील व्याज दरात कपात होणार?
रिझर्व्ह बँकेनं गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा रेपो रेट कमी केले आहेत. रेपो रेट कमी झाल्यानं अनेक बँकांनी त्यांचे फिक्स डिपॉझिट आणि सेव्हिंग अकाऊंटवरील व्याज दर कमी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी नवे दार लागू केले आहेत. तसंच अजूनही काही बँका व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या बचत आणि गुंतवणुकीवर होणार आहे.
बँकांना 12 दिवस सुट्टी
मे 2025 मध्ये देशभरातील बँकांना एकूण 12 दिवस सुट्टी आहे. त्यामध्ये बौद्ध पोर्णिमा आणि महाराणा प्रताप जयंतीचाही समावेश आहे. राज्यांनुसार या सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो. देशभरातील बँकांच्या सुट्ट्या एकसारख्या नसतात. प्रत्येक राज्यातील स्थानिक आणि प्रादेशिक सणांनुसार सुट्ट्या निश्चित केल्या जातात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसंच दर रविवारी संपूर्ण देशभर बँका बंद असतात. तुम्हाला काही कामांसाठी बँकेत जायचं असेल तर या सुट्ट्यांचं कॅलेंडर नक्की चेक करा.