
ATM cash withdrawal Charges 2025: ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 मे 2025 पासून मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना जास्तीचं शुल्क लागणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आतापर्यंत एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र 1 मे पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारांसाठी 23 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळी 21 ऐवजी 23 रुपये जास्त द्यावे लागतील. त्यामुळे एटीएममधून वारंवार पैसे काढणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
मोफत मर्यादांमध्ये कुठलाही बदल नाही
मोफत मर्यादेंबाबत कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ असा की ग्राहक अजूनही दरमहा त्यांच्या बँकेच्या एटीएममधून 5 वेळा मोफत पैसे काढू शकतात. मेट्रो शहरांमध्ये इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून 3 मोफत व्यवहार आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार उपलब्ध राहतील. जर तुम्ही निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तरच नवीन शुल्क लागू होईल.
(नक्की वाचा- UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद क्षणात विरला, निकालाच्या पाचव्या दिवशी मोहिनीवर दु:खाचा डोंगर)
नुकसान कसं टाळाल?
मात्र ग्राहकांनी केवळ मोफत मर्यादेत व्यवहार केले किंवा तुमच्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर केला तर या शुल्क वाढीचा फारसा परिणाम होणार नाही. वाढीव शुल्क टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट, यूपीआय किंवा मोबाईल वॉलेटसारखे पर्याय अधिक वापरणे फायदेशीर ठरेल.
कुणाला बसणार सर्वाधिक फटका
एटीएम शुल्कात वाढ झाल्याने सर्वात जास्त परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवर होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लहान बँकांकडे कमी एटीएम असतात आणि ते मोठ्या बँकांच्या नेटवर्कवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, जर मोफत व्यवहाराची मर्यादा संपली तर या ग्राहकांना प्रत्येक वेळी जास्त पैसे द्यावे लागू शकतात. अशा परिस्थितीत, जास्त शुल्क टाळण्यासाठी काही ग्राहक त्यांची बँक बदलण्याचा विचार करू शकतात.
(नक्की वाचा- Best Bus fare : मुंबईतील प्रवास महागणार, बेस्ट बसच्या भाडेवाढीला BMC ची मंजुरी)
एटीएम शुल्क वाढवण्याचे कारण काय?
बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर बऱ्याच काळापासून शुल्क वाढवण्याची मागणी करत होते. एटीएम चालवण्याचा खर्च वाढला आहे आणि त्यांना तोटा होत आहे. यावर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आरबीआयला शुल्क वाढवण्याची शिफारस केली होती, जी आता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे हा नवीन नियम 1 मे पासून लागू होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world