NSE IPO Listing News 2026: भारतीय शेअर बाजाराचा कणा असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) आयपीओबाबतची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या आयपीओची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत होते, त्या दिशेने आता वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आपल्या आगामी आयपीओ प्रक्रियेसाठी देश-विदेशातील तब्बल 20 दिग्गज मर्चंट बँकर्सची फौज मैदानात उतरवली आहे. या मोठ्या निर्णयामुळे आता एनएसईचा आयपीओ लवकरच बाजारात धडकणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आयपीओ समितीने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित वित्तीय संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे या आयपीओचा दर्जा आणि व्याप्ती जागतिक स्तरावर किती मोठी असेल, याची प्रचिती येत आहे.
या प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या रॉथचाइल्ड अँड कंपनी इंडियाची भूमिका आता पूर्ण झाली असून, पुढील जबाबदारी या निवडलेल्या बँकांकडे सोपवण्यात आली आहे.
( नक्की वाचा : IDFC FIRST Bank : बँकिंग क्षेत्रात खळबळ: 590 कोटींचा 'महाघोटाळा'; माजी मॅनेजरने बायकोच्या जोडीनं बँकच लुटली! )
बँकर्स आणि कायदेतज्ज्ञांची मोठी टीम
आयपीओ यशस्वी करण्यासाठी केवळ बँकर्सच नाही तर कायदेविषयक सल्लागारांचीही मोठी टीम सज्ज करण्यात आली आहे. एकूण 20 मर्चंट बँकर्ससोबतच 8 आघाडीच्या लॉ फर्म्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे सर्व तज्ज्ञ नियामक प्रक्रिया, कागदपत्रीकरण आणि मार्केटिंग अशा विविध आघाड्यांवर काम करणार आहेत. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की, पुढील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत हा आयपीओ बाजारात येऊ शकतो.
निवडण्यात आलेल्या 20 दिग्गज मर्चंट बँकर्सची यादी
Morgan Stanley India
Kotak Mahindra Capital Company Ltd.
JM Financial Ltd.
Axis Capital Ltd.
IIFL Capital Services Ltd.
Motilal Oswal Investment Advisors Ltd.
ICICI Securities Ltd.
SBI Capital Markets Ltd.
Nuvama Wealth Management Ltd.
HDFC Bank Ltd.
Avendus Capital Private Ltd.
Citigroup Global Markets India Private Ltd.
J.P. Morgan India Private Ltd.
HSBC Securities and Capital Markets (India) Private Ltd.
IDBI Capital Markets & Securities Ltd.
360 ONE WAM Ltd.
Anand Rathi Advisors Ltd.
DAM Capital Advisors Ltd.
Pantomath Capital Advisors Private Ltd.
Equirus Capital Private Ltd.
कायदेविषयक सल्लागार आणि इतर संस्था
या प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी सिरिल अमरचंद मंगलदास, खैतान अँड कंपनी, लॅथम अँड वॉटकिन्स, सिडली ऑस्टिन, एझेडबी अँड पार्टनर्स, एस अँड आर असोसिएट्स, शार्दुल अमरचंद मंगलदास आणि ट्रायलीगल या 8 दिग्गज कायदेविषयक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्स आणि कन्सेप्ट कम्युनिकेशन यांसारख्या कंपन्या मार्केटिंग आणि धोरणात्मक नियोजनासाठी काम करतील. 1994 पासून कार्यरत असलेल्या एनएसईने भारतीय शेअर बाजारात आपले वर्चस्व कायम राखले असून, आता या आयपीओच्या माध्यमातून नवीन इतिहास रचण्यासाठी ती सज्ज झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world