तुमचा मुलगा 25 व्या वर्षी होईल कोट्यधीश, 'या' पद्धतीनं करा बचतीला सुरुवात

नियोजनबद्ध पद्धतीनं गुंतवणूक केल्यास तुमचा मुलगा 25 वर्षांचा झाल्यावर त्याच्या खात्यात 1,03,08,014 रुपये जमा असतील. विशेष म्हणजे ही संपूर्ण करमुक्त रक्कम आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

जगभरातील प्रत्येक आई-वडिल त्यांच्या मुलाच्या समृद्धीसाठी झटत असतात. त्यांचं प्रत्येक काम, प्रत्येक निर्णय मुलाच्या भविष्याशी संबंधित असतो. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा सरकार सत्तेत आलं. त्यानंतर सरकारनं मुलींसाठी वेगवेगळ्या बचत योजना सुरु केल्या आहेत. त्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या मुलींना मोठा फायदा मिळू शकतो.  मुलांसाठी या प्रकारची कोणती योजना अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. पण, सध्या सुरु असलेल्या बचत योजनांमधील काही योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा मुलगा 25 व्या वर्षीच कोट्यधीश होईल. त्याचबरोबर ही सर्व रक्कम व्हाईट आणि टॅक्स फ्री असेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणत्या योजनेत कराल गुंतवणूक ?

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund) किंवा पीपीएफ (PPF) योजनेत गुंतवणूक केल्यानं तुमच्या मुलाला हा फायदा मिळणार आहे. ही सध्याची सर्वात फायदेशीर योजना आहे. तुमचा मुलगा 25 वर्षाचा होईपर्यंत कसा करोडपती होऊ शकतो, तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात करमुक्त एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रुपये कसे देऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Advertisement

या योजनेनमध्ये आई-वडिलांपैकी जे मुलाच्या अकाऊंटमध्ये PPF ची रक्कम जमा करत आहे त्याला दरवर्षी 46,800 रुपये बचत होऊ शकते. अर्थात गुंतवणूकदारानी आयकरमधील सर्वोच्च असा 30 टक्के टॅक्स स्लॅब अदा केल्यानंतरच त्यांना करामधून 46,800 रुपये सवलत मिळू शकेल, ही महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल. तुम्ही मुलाच्या बचत खात्यात रक्कम जमा करत असताना आयकरमधील कमी स्लॅबच्या अंतर्गत कर भरला तर तुमच्या कराची सवलतही त्याच प्रमाणात कमी होईल.   

Advertisement

( नक्की वाचा : 15000 पगारात बना करोडपती; EPF मधील गुंतवणुकीचं गणित समजून घ्या )
 

महत्त्वाची माहिती

PPF ही गेल्या काही दशकांमधील सर्वाधिक लोकप्रिय बचत योजना आहे. केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनेत याचा समावेश केला जातो. या योजनेच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या मुलाचं खातं पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत सुरु करु शकता. PPF खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 ते कमाल 1,50,000 रुपये तुम्ही जमा करु शकता. त्याचं व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या खात्यात जमा होते.

Advertisement

तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातील (1 एप्रिल) मुलाच्या खात्यामध्ये  1,50,000 रुपये जमा केले तर वर्षाच्या शेवटी तुमच्या खात्यात कमाल व्याज रक्कम जमा होईल. सध्या सरकारकडून या खात्यावर 7.1 टक्के दरानं व्याज देत आहे.  

( नक्की वाचा : मुंबईकरानं वाढत्या कराबाबत केली थेट अर्थमंत्र्यांकडं तक्रार, पाहा काय मिळालं उत्तर )
 

सर्वात मोठं वैशिष्ट्य 

PPF योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही सरकारच्या EEE योजनेत समाविष्ट आहे. याचाच अर्थ प्रत्येक वर्षी मुलाच्या नावावर जमा झालेल्या रकमेतून तुम्हाला करामध्ये सवलत मिळते. प्रत्येक वर्षी जमा झालेल्या रकमेच्या व्याजावर तुमच्या मुलाला कोणताही कर द्यावा लागणार नाही. या योजनेची मुदत संपल्यानंतर मिळणारी संपूर्ण रक्कम (मूळ गुंतवणूक आणि व्याज) ही करमुक्त असेल. 

तुमचा मुलगा कसा होणार कोट्यधीश?

या योजनेनुसार तुमचा मुलगा 25 व्या वर्षी कोट्यधीश कसा बनेल हे समजून घ्या. सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणे तुम्ही PPF मध्ये मुलचा जन्म होताच त्याच्या नावाचं खातं सुरु करु शकता. प्रत्येक वर्षी 1 एप्रिलला या खात्यात कमाल 1,50,000 रुपये जमा केले तर त्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेत 31 मार्चला त्या खात्यामध्ये 10,650 रुपये व्याज जमा होईल. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमचा बॅलन्स 1,60,650 रुपये असेल. त्यानंतर पुढच्या वर्षी आणखी 1,50,000 रुपये जमा झाल्यानंतर 3,10, 650 रुपये होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला  3,10, 650 रुपयांवर व्याज मिळेल. त्या व्याजाची रक्कम 22,056 रुपये असेल. या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक वर्षी तुमच्या मुलाच्या PPF खात्यात 1,50,000 रुपये टाकले तर मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत मुलाच्या खात्यात 40,68,209 रुपये जमा होईल. त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम 22,50,000 रुपये तर व्याजाची रक्कम 18,18,209 होईल.

आता तुमचा मुलगा 15 वर्षांचा झालाय.  तो कोट्याधीश होण्याची सुरुवात यावर्षी होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे PPF खात मॅच्युअर होण्यापूर्वी अर्ज करुन ते पाच वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते. ही पाच वर्षांची मुदतवाढ कितीही वेळा घेता येते. तुम्ही तुमच्या मुलाच्या खात्याची मुदत वाढवली तरी तुम्हाला गुंतवणूकीचं वार्षिक चक्र कायम ठेवावं लागेल. त्यानंतर तुमचा मुलगा 20 वर्षांचा झाल्यानंतर त्याच्या खात्यात 36, 58,288 रुपये जमा असतील. दोन वर्षांपूर्वी तुमचा मुलगा सज्ञान झाल्यानंतर तो स्वत:  प्रत्येक वर्षी या खात्यामध्ये गुंतवणूक करु शकतो. 

तुमच्या मुलानं आणखी एकदा PPF खात्याची मुदत पाच वर्षांसाठी वाढवली आणि त्यामध्ये स्वत: देखील गुंतवणूक केली तर तुमच्या मुलाच्या खात्याच पाच वर्षांनंतर तो 25 वर्षांचा झाल्यानंतर PPF च्या एकूण खात्यात 1,03,08,014 रुपये जमा असतील. त्यामध्ये गुंतवणूक 37,50,000 रुपये आणि व्याज 65,58,015 रुपये असेल. 

(स्पष्टीकरण : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित योजनांचा संपूर्ण अभ्यास करुन तसंच या क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करुनच गुंतवणूक करावी. NDTV नेटवर्क यामधील कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीची हमी घेत नाही. तसंच यामधून होणाऱ्या परिणामांनाही जबाबदार नाही.)
 

Topics mentioned in this article