रॅडिको खेतान ही भारतातील नावाजलेली दारू निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षात IMFL म्हणजेच भारतीय बनावटीची विदेशी मद्य या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतामध्ये आणि भारताबाहेर या कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. या कंपनीने दोन नवे ब्रँड लाँच केले आहेत. त्रिकाल ही सिंगल माल्ट आणि दुसरी मॉर्फिअस ही सुपर प्रिमिअम व्हिस्की रॅडिको खेतानने बाजारात आणली आहे. उंची मद्याचा शौक असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र त्यासोबतच गुंतवणूकदारांसाठीही एक चांगली बातमी आहे, कारण मोतीलाल ओसवाल यांनी रॅडिको खेतानचा शेअर येत्या 12 महिन्यांच्या कालावधीत 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रॅडिको खेतान कंपनीला आर्थिक वर्ष 2025मध्ये 4 हजार 800 कोटींचा नफा झाला आहे. या कंपनीने उंची दारूच्या सेगमेंटमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. उंची दारू विक्रीचे प्रमाण गेल्या 10 वर्षांत 4 पट वाढले आहे. या सेगमेंटमध्ये वाढ होत असल्याने कंपनीला चांगला फायदा होईल असे भाकीत मोतीलाल ओसवालने वर्तवले आहे. कंपनीने बाजारात आणलेल्या नव्या प्रॉडक्टमुळे याला आणखी बळ मिळेल असाही अंदाज आहे. कंपनीचे वितरण अधिक चांगले होत चालले आहे. कंपनीचे रिटेल टच पॉईंट 1 लाखांपर्यंत पोहोचले आहेत. मोतीलाल ओसवालने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात असेही म्हटले आहे की, कंपनीची 16 टक्के वाढ होणं अपेक्षित आहे.
आपण कंपनीला फायदेशीर असणाऱ्या बाबी कोणत्या ठरतील ते पाहूया, सोबतच कंपनीसाठी चिंताजनक ठरणाऱ्या बाबी कोणत्या आहेत ते देखील पाहूयात. सुरूवात करूया चिंताजनक बाबींपासून. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे काचेचे दर आणि कच्चा मालाचे दर. बॉटलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेचे दर वाढले तर कदाचित कंपनीच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. उंची दारूच्या निर्मितीसाठी एक्स्ट्रॉ न्यूट्रल अल्कोहोलचा वापर केला जातो. याच्या किंमती वाढल्या तर त्यामुळेही मार्जिनवर परिणाम होईल. या व्यतिरिक्त भारतातील एखाद्या राज्याने त्यांचा महसूल वाढावा यासाठी अबकारी कर वाढवला तर ही बाब कदाचित कंपनीसाठी चिंताजनक ठरू शकते.
आता कंपनीसाठी सकारात्मक बाबी कोणत्या आहेत ते पाहूया. या कंपनीची उत्पादने "प्रेस्टीज अँड अबाव्ह" सेगमेंटमध्ये मोडतात. या सेक्टरमधील दारूची किंमत जास्त असते, त्यामुळे कंपनीला अधिक मार्जिन मिळेल ज्यामुळे कंपनीला होणारा फायदा वाढण्याची शक्यता आहे. दारूनिर्मितीसाठीच्या कच्च्या मालाच्या किंमती स्थिरावल्याने त्याचाही फायदा होईल. कंपनीची ऑपरेशनल क्षमता वाढत असून सप्लाय चेनमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळू लागला आहे. कंपनीने विविध गोष्टींवरील खर्च वाढला होता, ज्यामुळे कंपनीवरील कर्ज वाढलं होतं. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीच्या डोक्यावरील कर्ज 100 कोटींनी कमी झाले होते. येत्या काळात हे कर्ज आणखी कमी होईल अशी शक्यता आहे. ज्यामुळे त्यांना फायदा होईल.कंपनीचा शेअरचा पीई 67पट इतका आहे. कंपनीसाठीचे भविष्य चांगले दिसत आहे, या सेक्टरमध्ये स्पर्धा कमी दिसते आहे, नवे प्लेअर बाजारात येण्याची शक्यता कमी आहे असे चित्र दिसत असल्याने कंपनीचे भवितव्य सध्या उज्ज्वल असल्याचे मोतीलाल ओसवालचे म्हणणे आहे.