
मुंबई: मुंबईसह राज्यभरात मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना केली असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईमध्ये अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक भागांमध्ये नालेसफाई, रस्त्यांची कामे रखडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आदित्य ठाकरेंची टीका
गेल्या 3 वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचले आहे जिथे पूर्वी कधीही पाणी साचले नव्हते. 2021/22 मध्ये आपण ज्या हिंद माताला पाणी साचण्यापासून मुक्त केले होते, ती आज पुन्हा पाणी साचले आहे कारण बीएमसीने वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
तसेच गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकी नाका होता. आज, असे अनेक भाग आहेत जिथे भाजपच्या भयानक कारभाराचा सामना आपण पाहतो. भाजपला मुंबईचा इतका द्वेष का आहे की त्यांनी मुंबईला अर्धवट रस्ते, नाले साफ न केलेले आणि पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्याने अडचणीत आणले आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
नक्की वाचा - Monsoon news: मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल,'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
काँग्रेसचीही टीका
महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली.मुंबईच्या रस्त्यावर राज्यसरकार आणि महापालिकेतील प्रशासनराजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीवर तोफ डागली आहे.
तसेच एका पावसाने भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असे दिसतेय.मुंबईला लुटणा-या या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world