- चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर रिझर्व्ह बँकेने पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तविला आहे
- आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जागतिक युद्ध आणि अल नीनो यामुळे महागाई वाढेल असे सांगितले आहे
- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाई होणार आहे
India Inflation Estimates: चालू आर्थिक वर्षात देशात महागाई कशी असेल अशी चर्चा सध्या सुरू आहे. आता पाहीलं तर महागाईने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं बजेट कोलमडलं आहे. त्यात आता चालू आर्थिक वर्षात ही सर्वसामान्य जनतेला महागाईचे तीव्र चटके बसण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या पतधोरण समितीत चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 50 बेसिस पॉईंट्सने वाढवला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली की, FY 2027 मध्ये महागाईचा दर 5.1% राहू शकतो. जो पूर्वी 4.6% राहण्याचा अंदाज होता. हा दर आरबीआयच्या 2% ते 4% च्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे महागाईच्या झळा सर्व सामान्यांना बसणार हे स्पष्ट आहे.
गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या मते, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आहे. शिवाय'अल नीनो'चा प्रभाव या दोन कारणा मुळे महागाई वाढणार आहे. युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 110 डॉलरवर पोहोचले आहेत. याचा थेट परिणाम मे महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर दिसू लागला आहे. दुसरीकडे, अल नीनोमुळे मान्सूनवर परिणाम होऊन कृषी उत्पादनात घट होण्याची भीती आहे. या सगळ्याचा फटका म्हणून महागाई वाढणार आहे.
तिमाहीनुसार महागाईचा संभाव्य दर
आरबीआयच्या सुधारित अंदाजानुसार, आगामी तिमाहींमध्ये महागाईचा आलेख खालीलप्रमाणे राहू शकतो.
- जून 2026 तिमाही: 4.2%
- सप्टेंबर 2026 तिमाही: 5.1%
- डिसेंबर 2026 तिमाही: 5.9%
- मार्च 2027 तिमाही: 5.4%
फेब्रुवारी 2026 मध्ये महागाई 3.2% होती. तर मार्चमध्ये 3.4% आणि एप्रिलमध्ये 3.5% इतकी नियंत्रणात होती. मात्र, आता ऊर्जा संकट आणि अन्नधान्याची संभाव्य टंचाई यामुळे आरबीआयला हा अंदाज वाढवावा लागला. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. देशात येत्या काळात महागाईचा मोठा भडका उडणार असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज थेट 5.1% केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर सुरू असलेली युद्धे आणि अल नीनोचा धोका यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.