'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ' सोशल मीडियावरील तीव्र नाराजीची दखल घेत 'ऑपरेशन सिंदूर' या शब्दाच्या ट्रेडमार्कसाठी दिलेला अर्ज मागे घेतला आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर 7 मे रोजी करण्यात आलेल्या लष्करी कारवाईला 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव दिले होते. या नावाचे ट्रेडमार्किंग करण्यासाठी कंपनीने अर्ज दाखल केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडियावर या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले. अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गुरुवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यामध्ये एका 'कनिष्ठ व्यक्ती'नं चुकून हा अर्ज दाखल केला होता, असं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ स्टुडिओज या युनिटने आपला ट्रेडमार्क अर्ज मागे घेतला आहे. एका कनिष्ठ व्यक्तीनं अधिकृत अधिकार नसताना हा अर्ज चुकून दाखल केला होता, असं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे.
( नक्की वाचा : Operation Sindoor : आजवरच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा 'ऑपरेशन सिंदूर' चं वेगळेपण काय? संपूर्ण माहिती वाचून वाटेल अभिमान! )
ऑडिओ-व्हिज्युअल सामग्रीचे उत्पादन आणि वितरण, इलेक्ट्रॉनिक प्रकाशन, कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करणे, भाषा शिकवणे यासारख्या गोष्टींचा समावेश असलेल्या वर्ग 41 अंतर्गत, विविध प्रकारच्या मनोरंजन आणि प्रकाशन सेवांसाठी विशेष वापराची मागणी करणारा हा अर्ज 7 मे रोजी सरकारचे पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयात दाखल करण्यात आला होता.
रिलायन्सनं आता हा अर्ज मागे घेतला आहे. पण, लष्करी कारवाईवर आधारित निर्मितीसाठी हा अर्ज दाखल केला होता का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कंपनीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ही चर्चा सुरु झाली होती.
गेल्या वर्षी, रिलायन्स आणि द वॉल्ट डिस्ने कंपनीने भारतात त्यांचे टेलिव्हिजन आणि स्ट्रीमिंग व्यवसाय एकत्रित करण्यासाठी 8.5 अब्ज डॉलर्सच्या करार केला होता. स्टारप्लस, कलर्स टीव्ही, स्टार गोल्ड, स्टार स्पोर्ट्स, स्पोर्ट्स18, डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओसिनेमा यांसारख्या मनोरंजन क्षेत्रातील प्लॅटफॉर्म यामध्ये समावेश आहे. नोव्हेंबरपासून हा करार अस्तित्वात आला आहे.