मेहबूब जमादार, प्रतिनिधी
Avadhut Sathe : महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय असलेले शेअर बाजार प्रशिक्षक अवधूत साठे हे सध्या चर्चेत आहेत. सेबी (SEBI) म्हणजेच भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सेबीने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन करून सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा त्यांच्यावर संशय आहे.
नेमकी कारवाई काय आहे?
अवधूत साठे हे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि कर्जतच्या ‘अवधूत साठे अकॅडमी' मधून शेअर बाजारातील ट्रेडिंगचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या एका कोर्सची फी 85 हजार रुपयांपर्यंत असल्याचा उल्लेख आहे.त्यांच्या यूट्यूब चॅनलचे 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
( नक्की वाचा : Online Gaming Bill 2025: Dream11, MPL सह सर्वच 'पेड गेम्स' बंद, तुमच्या पैशांचं काय होणार? )
सेबी कठोर का झालीय?
सेबीने जानेवारी 2025 मध्ये फिनइन्फ्लुएन्सर्ससाठी नवीन नियम तयार केले. या कठोर नियमावलीमागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे
लहान गुंतवणूकदारांचे नुकसान: सेबीच्या अहवालानुसार, शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना तोटा होतो.
सोशल मीडिया टिप्सवर अवलंबित्व: बहुतांश छोटे गुंतवणूकदार सोशल मीडियावर मिळणाऱ्या टिप्सच्या आधारे गुंतवणूक करतात, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते.
गुंतवणूकदारांचा विश्वास: एकदा मोठा तोटा झाला की गुंतवणूकदार कायमचे शेअर बाजारापासून दूर जातात. हे थांबवण्यासाठी, टिप्स देणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक होते.
( नक्की वाचा : KBC मध्ये 1 कोटी जिंकल्यावर खात्यात किती पैसे येतात? फार कमी लोकांना माहीत आहे उत्तर )
सेबीची नियमवली काय आहे?
- सेबीच्या नियमांनुसार, शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीबद्दल सल्ला देणाऱ्यांनी खालील गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे:
- नोंदणी अनिवार्य: गुंतवणूक सल्ला देणाऱ्यांनी सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
- ‘लाईव्ह ट्रेडिंग'वर बंदी: नोंदणीकृत सल्लागारांना लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये धडे देता येणार नाहीत.
- ब्रोकरेज फर्मशी संलग्नता नाही: नोंदणी झालेल्या व्यक्तींना कोणत्याही ब्रोकरेज किंवा ट्रेडिंग फर्मशी संलग्न होऊन काम करता येणार नाही.
अवधूत साठे यांनी यापैकी किमान दोन नियमांचे उल्लंघन केल्याचा सेबीला संशय आहे.
या प्रकरणी सेबीची चौकशी थांबली असली तरी, जप्त केलेल्या कागदपत्रांमधून पुढे काय माहिती उघड होते आणि ही केस कशी पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.