
सिंगापूर सरकारच्या तेमासेक होल्डिंग्स (Temasek Holdings) या कंपनीने हल्दीराममधील समभाग 8,400 कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर आणि दिल्ली येथील हल्दीराम ग्रुप कंपनीचे मूल्यमापन 84,000 कोटी रुपये एवढे करण्यात आले आहे. 90 वर्षे जुन्या हल्दीराम समूहातील 10 टक्के समभाग घेण्यासाठी सिंगापूर सरकारच्या तेमासेक होल्डिंग्सने भारतीय स्पर्धा आयोग (CCI) कडे मंजुरीसाठी अर्ज केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने या दोन विभागांच्या विलिनीकरणास मंजुरी दिली असली तरी, इतर नियामक मंजुरी अद्याप प्रलंबित आहेत. अग्रवाल कुटुंबाच्या मालकीच्या या व्यवसायात नागपूर आणि दिल्ली येथील दोन युनिट्स एकत्र करण्यात आली आहेत. नागपूरच्या हल्दीराम फूड प्रायव्हेट लिमिटेड आणि दिल्लीच्या हल्दीराम स्नॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या दोन चुलत भावांकडून चालवल्या जातात. या दोन कंपन्या एकत्र करून हल्दीराम फूड्स अँड स्नॅक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने नवीन कंपनी स्थापन करण्यात आली आहे.
तेमासेक होल्डिंग्स आपला हिस्सा जोंगसॉंग इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या शाखेद्वारे विकत घेणार आहे. हल्दीराम स्नॅक्स फूड ही भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड स्नॅक्स आणि मिठाई उत्पादक कंपनी तसेच रेस्टॉरंट साखळी आहे. भारतीय स्पर्धा आयोगाकडे दाखल केलेल्या अर्जात हल्दीराम कंपनी भारतातील पॅकेज्ड फूड उत्पादन आणि विक्री व्यवसायात कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नक्की वाचा - Job Opportunities : पुणे की बंगळुरू, कोणतं शहर नोकरदारवर्गासाठी बेस्ट? 'त्या' LinkedIn पोस्टवरुन चर्चेला उधाण
यासोबतच, स्नॅक्स, मिठाई, रेडी-टू-ईट उत्पादने, डेअरी उत्पादने, बेकरी पदार्थ, चॉकलेट आणि नॉन-कार्बोनेटेड ड्रिंक्स यांसारख्या विस्तृत उत्पादन श्रेणीचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले आहे. हल्दीरामचे प्रवर्तक अगरवाल कुटुंब आणखी काही हिस्सा विकण्यासाठी नवीन गुंतवणूकदार शोधत आहेत. 2024 या आर्थिक वर्षात कंपनीने 12,500 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे. हा करार काही महिन्यांच्या वाटाघाटीनंतर झाला असून, याआधी ब्लॅकस्टोन, अल्फा वेव्ह ग्लोबल आणि बैन कॅपिटलसह इतर खाजगी इक्विटी फर्म्सही हल्दीराममध्ये गुंतवणुकीसाठी इच्छुक होत्या.
तसेच, अगरवाल कुटुंब भारतीय शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी पुढील वर्षी IPO (प्रारंभिक समभाग विक्री) आणण्याचा विचार करत आहे. पूर्वी, कंपनी मोठ्या प्रमाणात समभाग विकण्याचा विचार करत होती, मात्र आता त्यांनी केवळ 10 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या भांडवलामुळे हल्दीराम स्नॅक्स फूडला भारतात तसेच निवडक परदेशी बाजारपेठांमध्ये व्यवसाय विस्तार करण्यास मदत होणार आहे. हल्दीराम स्नॅक्स फूड ही दिल्ली आणि नागपूर शाखांमध्ये विभागलेल्या हल्दीराम कुटुंबाच्या व्यवसायांचे एकत्रित रूप आहे.
1937 मध्ये गंगा भीषण अगरवाल यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये एक छोटी मिठाई आणि नमकीन विक्रीची दुकान सुरू करून हल्दीरामची स्थापना केली होती. 2022 मध्ये, दिल्लीस्थित हल्दीराम स्नॅक्स आणि नागपूरस्थित हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल यांना प्रथम विभाजित करून नंतर "हल्दीराम स्नॅक्स फूड" या एकाच कंपनीत विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world