प्रत्येक अर्थसंकल्पात कर रचनेत काय बदल होणार याकडं सर्वसामान्यांचं लक्ष असतं. वेगवेगळे कर हे सरकारला महसूल प्राप्त करण्याचं माध्यम आहे. हा कर भरताना खिसा चांगलाच रिकामा होत असल्यानं त्यामधून जास्तीत जास्त सूट मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. एका मुंबईकरानं वाढत्या कराबाबत थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्याकडंच तक्रार केली. त्यावर अर्थमंत्र्यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय बनलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'व्हिजन फॉर इंडियन फायनान्स मार्केट' या कार्यक्रमात मुंबईतील एका ब्रोकरनं (शेअर मार्केटमधील दलाल) केंद्रीय अर्थमंत्र्यांकडं तक्रार केली. गुंतवणूकदार आपला पैसा जोखिममध्ये टाकून त्यामधून नफा कमावतात. पण, सरकार त्यावर कराचं मोठं ओझं टाकून फायदा मिळवते, असं या ब्रोकरनं अर्थमंत्र्यांना सांगितलं. त्यांनी कर भरणारे दलाल आणि गुंतवणूकदार हे सरकारचे Sleeping Partner आहेत, असं वर्णन या ब्रोकरनं केलं. या ब्रोकरनं केलेली ही तुलना ऐकून अर्थमंत्र्यांनाही हसू आवरलं नाही.
जीएसटी, आयजीएसटी, स्टँप ड्यूटी, एसटीटी यासह वेगवेगळ्या करांचा या ब्रोकरनं यावेळी उल्लेख केलवा. गुंतवणूक करणाऱ्या दलालांपेक्षाही सरकारची कमाई ही जास्त असते, या मुद्यावर त्यांनी जोर दिला. 'आज भारत सरकार ब्रोकरपेक्षा जास्त कमाई करत आहे. गुंतवणूकदार आणि ब्रोकर अनेकदा मोठी जोखीम घेतात. सरकार तसं करत नाही. मी खूप जोखीम घेत आहे, पण, भारत सरकार सर्व फायदा घेत आहे. तुम्ही माझे स्लीपिंग पार्टनर आहे आणि मी वर्किंग पार्टनर आहे.'
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कार्यक्रमात मोदी सरकारनं केलेल्या कामांचा उल्लेख केला. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे गेल्या 10 वर्षात वेगानं आणि अभूतपूर्व प्रमाणात पायाभूत व्यवस्थेची उभारणी झालीय, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 2014 पासून आत्तापर्यंत 3.74 लाख किलोमीट ग्रामीण रस्ते तयार झाले आहेत. यापूर्वीच्या ग्रामीण रस्त्यांपेक्षा हे दुप्पट प्रमाण आहे, असं सीतारमण यांनी सांगितलं. मेट्रो रेल्वेमुळे कनेक्टिव्हिटी वाढली असून त्यामधून ट्रॅफिक जाममध्ये सुटका होत आहे. शहरातील नागरिकांच्या आयुष्यात सुधारणा होण्यास यामुळे मदत झाल्याचं त्यांनी सांगितलं.