नवीन आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशा शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं आयातशुल्क धोरण (टॅरिफ) आणि जागतिक अनिश्चिततचा याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे.
अमेरिकच्या समसमान कर आकारणीच्या भीतीने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरु झाली, यामुळे शेअर बाजार गडगडला. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा जोर वाढला आहे. सकाळी 11.15 वाजता शेअर बाजाराचा इंडेस्ट सेन्सेक्समध्ये 1058 अंकांची म्हणजे 1.35 टक्के घसरणीची नोंद झाली. तर निफ्टीमध्ये 275 अंकांची म्हणजे 1.17 टक्क्यांच्या घसरणीची नोंद झाली आहे.
सेबी नोंदणीकृत सल्लागार केदार ओक यांनी याबाबत म्हटलं की, "बाजारात आज झालेली पडझड ही गेल्या दोन दिवसात जागतिक बाजारात जे घडलं त्याची प्रतिक्रिया आहे. लाँग वीकएंड नंतर आज बाजार नकारात्मक उघडला. पण पहिल्या तासात तो कव्हरही झाला होता. टेरिफचा निर्णय हा जरी कळीचा मुद्दा असला तरी त्याची कवित्व आता संपल्यात जमा आहे. किती दिवस तेच तेच धरून बसणार, बाजार आता त्याच्या पुढे गेला आहे. त्यामुळे गुंतवणुकीची ही सुवर्ण संधी आहे, असं मानलं पाहिजे."
"परदेशी वित्तसंस्था जेव्हा शेअर विकत होत्या त्यावेळी डोमेस्टिक वित्तसंस्था समभाग खरेदी करत होत्या. परदेशी वित्तसंस्था जरी शेअर विक्री करताना दिसल्या तरी त्यांनी मागील काळात मोठी खरेदी ही केली आहे. अडीच टक्के जास्त कॅपिटल गेन पुढे कशाला भरायचा हा विचार करून त्यांनी नफेखोरीही केली असेल आणि नवीन गुंतवणूक लार्ज कॅप मध्ये केली असेल", असंही केदार ओक यांनी सांगितलं.
"आता परदेशी वित्त संस्था सक्रिय व्हायला हव्या असतील तर डोमेस्टिक वित्तसंस्था यांनी विक्री केली पाहिजे. तेव्हाच योग्य किमतीत त्यांना समभाग घेता येतील", असा अंदाजीह केदार ओक यांनी वर्तवला.