Zara Hatke News: जगभरातील आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र एक करतात. मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी ते मेहनत करून पैसे जमा करीत असतात. मात्र तुम्ही कधी अशा वडिलांबद्दल ऐकलं आहे का की, ज्यांनी आपल्या मुलाला म्हटलं, एक तर अभ्यास कर नाहीतर माझ्याकडून पैसे घेऊन बर्गर विक... अमेरिकेतली एका वडिलांच्या याच अटीमुळे आज त्यांचा मुलगा ३२ हजार कोटींच्या साम्राज्याचा मालक बनला आहे. ही कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध फास्ट कॅज्युअल बर्गर चेन फाइव्ह गाइज (Five Guys) आणि त्याच्या संस्थापकांच्या कुटुंबाची आहे. आज या ब्रँडचा केवळ अमेरिकेतच नाही तर चीनसारख्या जगातील सर्वात मोठ्या मार्केटमध्ये दबदबा आहे.
Photo Credit: Five Guys
कधी आणि केव्हा सुरू झालं पहिलं दुकान?
१९८६ साली अमेरिकेच्या वर्जिनियामध्ये राहणारे जेरी आणि जेनी मुरेल यांनी आपल्या मुलासमोर एक प्रस्ताव ठेवला.. तुझ्या कॉलेजसाठी आम्ही जे पैसे जमा केले आहेत, त्यातून एकतर कॉलेजमध्ये जा किंवा स्वत:चा बिझनेस सुरू कर. मुलाने बिझनेसची निवड केली. त्याच पैशातून कुटुंबाने एक टेकआऊट बर्गरचं दुकान उघडलं. जेरी मुरेलने आपल्या आईची शिकवण कायम लक्षात ठेवली. जर तू लोकांना एक चांगली गुणवत्ता असलेला हॅमबर्गर खाऊ घालू शकतो, तर तू अमेरिकेत कायम पैसे कमावशील. त्याने आपल्या मेन्यूमध्ये फक्त बर्गर आणि फ्राईज ठेवले होते, पण गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही.
Photo Credit: Five Guys
वर्षानुवर्षे स्वत:चं रेस्टॉरंट चालविल्यानंतर २००३ मध्ये जेरी आणि जेनीने आपल्या पाच मुलांसह फ्रेंचाइजीचं वितरण सुरू केलं. त्यांचं बर्गर इतकं प्रसिद्ध झालं होतं की अवघ्या १८ महिन्यांच्या आत ३०० हून अधिक फ्रेंचाइजी विकली गेली. आज फाइव्ह गाइज जगभरातील २९ देशांत १,९०० हून अधिक रेस्टॉरंट चालवतात.
Photo Credit: Peter Clancy@RestaurantBusiness
अमेरिकेच्या बाहेर यांच्या सिस्टम सेल्सने १.१ बिलियन डॉलरचा आकडा पार केला आहे. ज्यामुळे नुकतच त्यांना २०२५ ग्लोबल रेस्टॉरंट लिडर ऑफ द इयरने गौरविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फाइव्ह गाइज आता जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठी ग्राहकपेठ चीनमध्ये पाय पसरत आहे.
Photo Credit: Five Guys