कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी यांनी भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक ऐतिहासिक उंचीवर असताना गंभीर इशारा दिला आहे गुंतवणूकदारांनी आणखी एका वावटळीला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हावं असं उदय कोटक यांनी म्हटलं आहे. उदय कोटक जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपली मतं नेहमीच सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असतात. चालू आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 75 हजाराच्या वर गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 हजाराच्या दिशेने वेगाने वाटचाल करताना दिसतोय. अशा स्थितीत उदय कोटक यांनी दिलेला हा इशारा गुंतवणूकदारांना वेळीच सावध करण्यासाठी पुरेसा आहे.
कोटक यांनी नेमक काय म्हटलं?
उदय कोटक हे स्वतः एक उत्तम अर्थशास्त्र तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा जागतिक अर्थकारण आणि त्यातील होणारे मॅक्रो स्तरावरील बदल टिपण्यात हातखंडा आहे. काल म्हणजे जगभरात रमझान ईद साजरी होत असताना उदय कोटक यांनी अशीच काही चोखंदळ निरीक्षणं नोंदवली आहेत. उदय कोटक सोशल मीडियाची मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्स वर म्हणतात, " अमेरीकेत महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढलाय. त्यामुळे येत्या काही दिवसांत तिथे होऊ घातलेली व्याजदरातली कपात आता पुढे ढकलली गेली आहे. ती आता अमेरिकेतील निवडणूकीच्या जवळ होईल. आणि तीही होईलच याची खात्री नाही. कच्चे तेल पुन्हा एकदा $९०/ बॅरल वर गेल्याने भारतासह सगळीकडे वस्तूचे दर चढेच राहणार आहेत. फक्त एक जमेची बाजू आहे. चीन आर्थिक दृष्ट्या कोसळतोय. आणखी एका जागतिक वावटळीसाठी तयार व्हा "
उदय कोटक यांच्या इशाऱ्याकडे दोन बाजूंनी बघता येईल
पहिली बाजू अशी की जागातिक पातळीवर ज्या भू-राजकीय #GeopoliticalEvents घडामोडी सुरू आहेत त्या जागतिक अर्थव्यवस्थेला फारशा उपयोगी नाहीत. उलट पुढील वाट आणखी बिकट करणाऱ्या आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर स्थानिक चलनांचा भाव डॉलरच्या तुलनेत घरण्याचा शिरस्ता नजीकच्या भविष्यात सुरू राहणार आहे. भारतासारख्या आयातक्षम देशांसाठी हे फारसं चांगलं नाही. रुपया डॉलरच्या तुलनेत घसरणे आणि कच्चे तेलही महाग होणे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यासारखे आहे. म्हणून चांगल्या विकासदाराच्या आशेने शेअर बाजारात आलेल्यांना मोठ्या परताव्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरी बाजू अशी की जागातिक पातळीवर सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणजेच चीन सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे तिथे होणारी गुंतवणूक आता भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांकडे वळू लागली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार नजीकच्या काळात गडगडले तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ती गुंतवणूकीची उत्तम संधी ठरु शकते.