अजित रानडेंवरील कारवाई योग्य की अयोग्य? कुलगुरुंची निवड कशी होते? रानडेंचा बायोडेटा काय सांगतो?

डॉ. रानडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांची पूर्तता करत नसल्याने त्यांना हटविण्यावाचून पर्याय नाही, असे गोखले संस्थेचे कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था (Gokhale Institute of Political Science and Economics) अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडे (Ajit Ranade) यांची शुक्रवारी नियुक्ती रद्द झाली. रानडे यांना दहा वर्षाचा प्राध्यापकीचा अनुभव नव्हता असा तीन सदस्य समितीने निष्कर्ष काढला अन् तडका फडकी रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्यात आलं. डॉ. रानडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांची पूर्तता करत नसल्याने त्यांना हटविण्यावाचून पर्याय नाही, असे गोखले संस्थेचे कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. एनडीटीव्हीने यासंदर्भात युजीसीची नियमावली काय आहे याची माहिती घेतली. युजीसीच्या नियमावलीनुसार कशी होते कुलगुरुंची निवड...  

विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड:

प्र-कुलगुरू:

प्र-कुलगुरूंची नियुक्ती कुलगुरूंच्या शिफारशीनुसार कार्यकारी परिषदेद्वारे केली जाते.

एखाद्या व्यक्तीची कार्यकारी परिषदेकडे प्र-कुलगुरू म्हणून शिफारस करणे हा कुलगुरूंचा विशेषाधिकार असेल. प्र-कुलगुरू हे कुलगुरूंच्या कार्यकाळाशी संबंधित ठराविक मुदतीसाठी पद धारण करतील.

नक्की वाचा - Ajit Ranade : पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांना पदावरुन हटवलं

कुलगुरू:
उच्च दर्जाची योग्यता, सचोटी, नैतिकता आणि संस्थात्मक बांधिलकी असलेल्या व्यक्तीची कुलगुरू म्हणून नियुक्ती करावी. कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात येणारी व्यक्ती ही विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वर्षांचा अनुभव किंवा प्रतिष्ठित संशोधन आणि/किंवा शैक्षणिक प्रशासकीय संस्थेतील दहा वर्षांचा अनुभव असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे पुरावे असणे आवश्यक आहे. शैक्षणिक नेतृत्व केलेले असावे.

रानडे यांचा बायोडाटाही एनडीटीव्हीकडे आहे. ते पाहता अजित रानडे यांना हटवताना समितीला नियमांची माहिती नव्हती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातले अभ्यासक/तज्ज्ञांनी रानडे यांना हटवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत धक्कादायक, निराशाजनक, कालविसंगत आणि शिक्षण क्षेत्राला मागे घेऊन जाणारा असल्याचे स्पष्ट मत आर्थिक विषयातील, तसेच शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले. ज्येष्ठशास्त्रज्ञ ‘सीएसआयआर'चे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर, माजी केंद्रीय वित्त सचिव डॉ. विजय केळकर, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, तसेच रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. 

राज ठाकरेही संतापले...
पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरुन डॉ. अजित रानडे यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित व खासगी क्षेत्रात मोठी कामगिरी केलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे हटवणं चुकीचं असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात स्वच्छेने उतरलेले रानडे यांच्यासारख्या व्यक्तीला नाउमेद करणारी सरकारची कृती असून उच्चशिक्षित व्यक्तींना बाहेर काढणे हे नवे शैक्षणिक धोरण आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.