Budget 2025 Expectations: आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण शनिवारी 11 वाजता मोदी सरकारचा 3.O चा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 8.30 वाजता आपल्या घरापासून नॉर्थ ब्लॉकच्या जायला निघतील. यानंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या टीमसह राष्ट्रपती भवनात जातील. येथे राष्ट्रपतींना अर्थसंकल्पाची एक प्रत सोपवण्यात येईल. राष्ट्रपतींकडून परवानगी मिळाल्यानंतर त्या पुन्हा मंत्रालयात परततील आणि सकाळी 9 वाजता नॉर्थ ब्लॉकच्या गेट नंबर 2 वर फोटो शूट करतील. त्यानंतर या अर्थसंकल्पाला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली जाईल आणि तेथून अर्थमंत्री लोकसभेत पोहोचतील. या अर्थसंकल्पात काय काय मिळू शकतं?
- शेतकरी - या अर्थसंकल्पात केंद्र सरकार मोठी घोषणा करू शकतात. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीत वाढ करू शकते.
- महिला - सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरणासाठी तीन लाख कोटींची तरतूद केली होती. त्यामुळे सरकार यंदा अर्थसंकल्पात निधीमध्ये वाढ करेल अशी अपेक्षा आहे.
- मध्यमवर्गाला काय मिळणार? - आयकर मर्यादा आणि 80 सीमध्ये सूट मर्यादा वाढवण्यावर मध्यमवर्ग लक्ष ठेवून आहे. सरकारने याबाबत घोषणा केली तर मध्यमवर्गाच्या बऱ्याच समस्या दूर होतील.
- फेरीवाल्यांसाठी घोषणा - रस्त्यावरील फेरीवाल्यांची सर्वात मोठी समस्या जागेची आहे. रस्त्यावर दुकानं थाटण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आशा आहे की, सरकार परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना करेल.
- क्रिप्टोकरन्सी - भारतात क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात सकारात्मक आणि प्रगतीशील बदलांची अपेक्षा आहे. या क्षेत्राशी संबंधित लोकांकडून VDA व्यवहारावर टीजीएस एक टक्क्यांनी घटवून 0.01 करण्याची मागणी केली आहे.
- छोटे आणि मध्यम उद्योग - जगातील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतात मेक इन इंडियावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका छोटे आणि मध्यम उद्योगांची आहे. या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
- पर्यटन आणि सुरक्षा क्षेत्र - पर्यटन आणि सुरक्षा क्षेत्रावर मोदी सरकार मोठी घोषणा करू शकतात. सरकारकडून भारताला टुरिस्ट हब बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यासाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जगातील अनिश्चिततेमुळे सुरक्षा अर्थसंकल्पावर मोठा खर्च केला जाऊ शकतो. वायुसैन्यासाठी विमानाचा करारही लवकरच होण्याची अपेक्षा आहे.
- ग्रामीण भारत - 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला होता. अशात ग्रामीण आणि कृषी क्षेत्रावर अधिक लक्ष दिलं जाऊ शकतं.
- ऑटोमोबाइल क्षेत्र - यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी ऑटोमोबाइल उद्योगाने अर्थमंत्र्यांकडे केली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देशातील पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांसाठी FAME III प्रोत्साहन योजना जाहीर करतील.
- कस्टम्स ड्युटी कपात - आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठीच्या शिफारशींमध्ये, ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने सरकारला टॅरिफ स्लॅबची संख्या 40 वरून कमी करून फक्त पाच पर्यंत करीत कस्टम ड्यूटी संरचना अधिक सुलभ करण्याचं आवाहन केलं आहे.