देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या राज्य सहकारी बँका, जिल्हा सहकारी बँका आणि विविध कार्यकारी संस्थांमधून उत्कृष्ट कामगिरी कणाऱ्या संस्थांना देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गौरविण्यात आले .राज्य सहकारी बँकांच्या प्रवर्गात महाराष्ट्र राज्याची शिखर बँक असलेल्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी खास सन्मान करण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली येथील भारत मंडपमच्या भव्य सभागृहात नॅफस्कॉबच्या रजत जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याासह सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कृष्णपाल गुजर, एन.सी.यु.आयचे अध्यक्ष दिलीप संघानी, नॅफस्कॉबचे अध्यक्ष रविंद्रन राव आणि केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य सचिव आशिषकुमार भुतानी उपस्थित होते.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक ही संपूर्ण भारतात सर्वात जास्त ऊलाढाल, नेटवर्थ व निव्वळ नफा कमाविणारी राज्य सहकारी बँक आहे. दिनांक 31.03.2024 अखेर राज्य बँकेची ऊलाढाल 7,265 कोटी रुपये , स्व-निधी 7,121 कोटी रुपये , नक्त नफा रु.615 कोटी, नेटवर्थ 4,618 कोटी रुपये इतके आहे.
( नक्की वाचा : स्थिर सरकारचा होणार महाराष्ट्राला फायदा, शेअर मार्केटमधील तेजीचा अर्थ काय? )
याप्रसंगी बोलताना अमित शाह यांनी सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी `सहकारांतर्गत सहकार' हे सहकाराचे मुलभूत तत्व राबविण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तसेच सहकाराच्या या तत्वानुसार सर्व प्राथमिक सहकारी संस्थांनी आपल्या ठेवी संबंधित जिल्हा बँकांमध्ये आणि सर्व जिल्हा बँकांनी आपल्या ठेवी संबंधित राज्याच्या शिखर बँकेतच ठेवण्याचे आवाहन केले. या संदर्भात गुजरातमधील दोन जिल्हयांचे उदाहरण देताना या तत्वाचे पालन केल्याने तेथील जिल्हा व राज्य बँकेच्या ठेवींमध्ये 20% ची वाढ झाल्याचे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. सर्वांनी गुजरातमधील या संबंधित बँकांना भेट देण्याचे निमंत्रण दिले.