तेलंगणामधून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कामारेड्डी आणि हनमकोंडा जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात तब्बल 500 भटक्या कुत्र्यांची विषप्रयोग करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे क्रूर पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच सरपंचांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निवडणूक आश्वासनासाठी क्रूरता
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही उमेदवारांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले होते की, निवडून आल्यास ते भटक्या कुत्र्यांचा आणि माकडांचा बंदोबस्त करतील. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आता या सरपंचांनी कुत्र्यांना विष देऊन मारण्यासाठी 'सुपारी' दिल्याचा खळबळजनक आरोप प्राणी मित्रांनी केला आहे.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
विषारी इंजेक्शनचा वापर
प्राणी कल्याण कार्यकर्ते अडुलापुरम गौतम यांनी माचारेड्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, पालवांचा मंडळातील पाच गावांमध्ये ही सामूहिक हत्या करण्यात आली. सरपंचांनी एका व्यक्तीला भाड्याने बोलावून कुत्र्यांना विषारी इंजेक्शन देण्यास सांगितले. भवानीपेठ, फरीदपेठ, वाडी आणि बांदारामेश्वरपल्ली या गावांमध्ये कुत्र्यांचे मृतदेह कचऱ्याप्रमाणे फेकून देण्यात आले होते.
(नक्की वाचा- BMC Election 2026: दुबार मतदार असाल तरी करता येईल मतदान; या गोष्टी कराव्या लागतील)
पोलीस कारवाई आणि तपास
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पशुवैद्यकीय पथकांनी पुरलेले मृतदेह बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन केले आहे. नेमके कोणते विष वापरले गेले, हे शोधण्यासाठी व्हिसेरा नमुने फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत.