- देशभरात 23 मार्चनंतर 13 लाखांहून अधिक 5 किलोच्या छोट्या गॅस सिलेंडरची विक्री झाली आहे
- 5 किलो गॅस सिलेंडरसाठी स्थानिक पत्त्याचा पुरावा न मागता केवळ आधार कार्ड दाखवून कनेक्शन मिळते
- छोट्या गॅस सिलेंडरच्या रिफिलिंगची किंमत 598 रुपयांवरून 649 रुपयांपर्यंत वाढली आहे
5kg Gas Cylinder Booking Rules: देशभरात सध्या घरगुती गॅस वापराच्या बाबतीत मोठे बदल होत आहेत. विशेषतः विद्यार्थी, एकटे राहणारे नोकरीपेशा तरुण आणि छोट्या कुटुंबांसाठी 5 किलोचा 'छोटू सिलेंडर' हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 23 मार्चपासून आतापर्यंत 13 लाखांहून अधिक छोटू सिलेंडरची विक्री झाली आहे. यापूर्वी दररोज 77,000 सिलेंडर विकले जात होते, आता हा आकडा 1,00,000 च्या पार गेला आहे. एलपीजी गॅस वितरणात सुटसुटीतपणा आल्यामुळे छोट्या सिलेंडरच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक जण हाच सिलेंडर वापरावर भर देत आहेत.
या सिलेंडरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी स्थानिक पत्त्याचा पुरावा (Local Address Proof) देण्याची गरज नाही. केवळ आधार कार्ड दाखवून कोणालाही नवीन कनेक्शन घेता येते. यामुळे स्थलांतरित मजूर आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. या 5 किलो सिलेंडरच्या रिफिलिंगसाठी पूर्वी 598 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता ही किंमत 649 रुपये झाली आहे. म्हणजेच यात 51 रुपयांची वाढ झाली आहे. नवीन कनेक्शन घ्यायचे असल्यास साधारण 1,450 ते 1,700 रुपयांपर्यंत खर्च येतो. यामध्ये सिलेंडर, रेग्युलेटर आणि पहिल्या वेळच्या गॅसचा समावेश असतो. जर 5 वर्षांच्या आत कनेक्शन परत केले, तर जमा रकमेच्या 50% रक्कम ग्राहकाला परत मिळते.
घर सोडून दुसऱ्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी गॅस कनेक्शन मिळवणे आता डोकेदुखी राहिलेले नाही. इंडियन ऑइलच्या 5 किलोच्या 'छोटू' सिलेंडरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. सोपी प्रक्रिया आणि कुठेही उपलब्ध होत असल्याने याची विक्री दिवसाला 1 लाखावर पोहोचली आहे. तुम्हाला जवळच्या गॅस वितरकाकडे जाऊन फक्त तुमचे ओळखपत्र (आधार, ऑफिस आयडी किंवा कॉलेज आयडी) दाखवायचे आहे. कोणतीही लांबलचक कागदपत्रे न भरता तुम्ही डिपॉझिट जमा करून लगेच सिलेंडर घरी नेऊ शकता. सध्या गॅस रिफिलसाठी 649 रुपये मोजावे लागत आहेत. खिशायला परवडणारा आणि वापरायला सोपा असलेला हा पर्याय सध्या तुफान लोकप्रिय होत आहे. सध्याच्या आणीबाणीच्या स्थितीत हा सिलेंडर सर्वांसाठी वरदान ठरत आहे.
नक्की वाचा - Mumbai News: लाईव्ह कॉन्सर्ट... ओव्हरडोस; तरुण- तरुणीच्या मृत्यूने मुंबईत खळबळ, 5 अटकेत
महत्वाचे मुद्दे:
- वाढती मागणी: 23 मार्चनंतर 13 लाख सिलिंडरची विक्री.
- किंमत: रिफिलसाठी साधारण 649 रुपये खर्च.
- प्रक्रिया: कोणत्याही स्थानिक पत्त्याच्या पुराव्याशिवाय केवळ ओळखपत्रावर कनेक्शन उपलब्ध.
- उपयुक्तता: छोटे कुटुंब, विद्यार्थी आणि कामगारांसाठी सर्वोत्तम.
हा सिलिंडर वितरकांकडे सहज उपलब्ध असून, तो ने-आण करण्यासाठीही अत्यंत सोपा आहे. महागाईच्या काळातही छोट्या सिलेंडरचा हा पर्याय अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या सोयीचा ठरत आहे.