अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण विमान अपघातानंतर (Ahmedabad plane crash) एअर इंडियाच्या (Air India) विमानांची बरीच उड्डाणे रद्द करण्यात येत असून यामुळे प्रवाशांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागतोय. एकतर ही विमाने रद्द केली जातात किंवा उशिरा सुटतात. यामुळे होणारा त्रास अनेक प्रवाशांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रवासी एअर इंडियाच्या भोंगळ कारभारावर सातत्याने टीका करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही एअर इंडियाच्या कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागला. त्यांनी आपली तक्रार X पोस्टद्वारे मांडत आपली नाराजी व्यक्त केली होती.
सुप्रिया सुळे यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "मी दिल्ली ते पुणे AI 2971 दिल्ली-पुणे विमानाने प्रवास करत आहे. या विमानाला 3 तासांपेक्षा अधिक उशीर झाला आहे. उड्डाणाबद्दलची कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाहीये, काहीही मदत केली जात नाहीये आणि अत्यंत वाईट सेवा दिली जातेय. ढिसाळ कारभार, उशीर हे एअर इंडियाच्या विमानांबाबत नित्याचे झाले आहे. प्रवासे हतबलपणे अडकून पडले असून हे सगळं सहन करण्यापलिकडे आहे. मी हवाई वाहतूकमंत्री आणि मंत्रालयाला विनंती करतेय की त्यांनी यात लक्ष घालावे आणि या विमान कंपनीला जबाबदारीने वागण्यास सांगावे. प्रवाशांना चांगली सेवा मिळणं गरजेचं आहे. "
मंत्र्यांनी लक्ष घातले, एअर इंडिया प्रशासन हलले
नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सुप्रिया सुळे यांच्या 'एक्स' पोस्टवर प्रतिसाद देत सांगितले की मी एअर इंडिया प्रशासनाशी आणि विमानतळ अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांना प्रवाशांच्या होत असलेला त्रास आणि अडचणी दूर करण्यास सांगितले आहे.
अहमदाबाद इथे घडलेल्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाने बोईंगसह सगळ्या प्रमुख विमानांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे 6 उड्डाणे रद्द करण्यात आली. ही उड्डाणे खालीलप्रमाणे आहेत.
- AI 915 (दिल्ली-दुबई),
- AI 153 (दिल्ली-व्हिएन्ना),
- AI 143 (दिल्ली-पॅरिस),
- AI 159 (अहमदाबाद-लंडन),
- AI 133 (बंगळूरु-लंडन)
- AI 170 (लंडन-अमृतसर)