रामेश्वरम कॅफे ब्लास्टचा आरोपी पकडला, पुण्याची चक्कर कशी मारली?

जाहिरात
Read Time: 2 mins
बंगळुरु:

एका मोठ्या घडामोडीत बंगळुरुतल्या द रामेश्वरम कॅफे (The Rameswaram Cafe) ब्लास्टच्या आरोपीला पकडण्यात NIA ला यश आलेलं आहे. संबंधीत आरोपीचं नाव शब्बीर असं आहे. शब्बीरला कर्नाटकातल्या बेल्लारीतून अटक करण्यात आली आहे. पण रामेश्वर कॅफेमध्ये स्फोट घडवल्यानंतर शब्बीरनं पुण्यालाही चक्कर मारल्याची माहिती आहे. तो पुण्याला नेमका कसा गेला, का गेला याबाबत डिटेल माहिती मात्र अजून देण्यात आलेली नाही. शब्बीरला पकडण्यासाठी एनआयएनं 10 लाखाचं इनाम जाहीर केलेलं होतं. वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झालेला होता. त्यावरुनच त्याची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आलेली आहे.

Advertisement

रामेश्वरम कॅफे ब्लास्ट नेमका कधी झाला?
द रामेश्वरम कॅफे हा बंगळुरुतला (Bengaluru) फेमस कॅफे आहे. मोठ्या प्रमाणात तरुण ह्या कॅफेत येत असतात. 1 मार्च रोजी ह्याच रामेश्वरम कॅफेत IED ब्लास्ट करण्यात आला. सुरुवातीला हा ब्लास्ट सिलेंडर स्फोट असल्याचं सांगितलं गेलं पण नंतर तो आईडी ब्लास्ट असल्याचं उघड झालं. एनआयएने नंतर तपासाची सूत्रं हाती घेतली. ह्या स्फोटात कुणाचाही जीव गेला नाही पण 9 जण जखमी झाले. हा दहशत माजवण्याचाच प्रयत्न होता. विविध सीटीटीव्ही फुटेज तपासले गेले, त्यात एक जण, डोक्यावर टोपी घातलेला, पाठीवर बॅग असलेला संशयीत दिसून आला. स्फोट घडण्याच्या आधी तो कॅफेत शिरतोय आणि बॅग ठेवून तो निघून गेल्याचेही सीसीटीव्हीत कैद झाले. त्यानंतर तो बंगळुरुतल्या काही बसेसमध्ये प्रवास करत असल्याचेही बसच्या सीसीटीव्हीत दिसलं. त्यावरुनच एनआयएनं केस हाती घेतल्यानंतर त्याचे विविध फुटेज जाहीर केले. 

Advertisement
Advertisement

नेमका कसा पकडला गेला शब्बीर?
1 मार्चला स्फोट घडवल्यानंतर आरोपी शब्बीर हा कर्नाटकातलेच आणखी एक शहर बेल्लारीला गेल्याची माहिती मिळाली आहे. तिथूनच तो पुण्याला गेल्याचेही उघड झालं आहे पण तो महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात नेमका कसा आला, पोहोचला, इथं येऊन त्यानं नेमकं काय केलं, परत तो बेल्लारीला कसा गेला याची माहिती मात्र उघड केली गेलेली नाही. एनआयए ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधतं आहे. पण 1 मार्चच्या रात्री आरोपी शब्बीर हा कर्नाटकातील गोकर्णा ह्या फेमस बीचवर गेल्याची माहिती मिळालेली आहे. 

एनआयएचं 10 लाखाचं इनाम
1 मार्चला रामेश्वरम कॅफेत स्फोट झाला. त्यानंतरच्या घडामोडीत एनआयएनं तपासाची सूत्रं हातात घेतली. 6 मार्चला स्फोटाच्या आरोपीबाबत माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. त्याआधी एनआयएनं आरोपीचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे फोटोज समाज माध्यमं आणि इतर ठिकाणी जाहीर केली. आता आरोपी शब्बीर नेमका जाहीर केलेल्या इनामानुसार पकडला गेला की एनआयएनं स्वत:च्या नेटवर्कमधून त्याला पकडलं याची माहिती स्पष्ट होणं बाकी आहे. 
 

Topics mentioned in this article