'पक्ष्यांना उडण्याचं प्रशिक्षण मिळत नाही, ते स्वत:च आकाशाची उंची मोजतात'. वयाच्या तिसऱ्या वर्षी ॲसिड हल्ल्याची शिकार झालेल्या कैफीसाठी या ओळी अगदी तंतोतंत लागू होतात. कैफीला दिसत नाही, कारण ॲसिड हल्ल्यात तिचे डोळे गेले. चेहरा पूर्णपणे भाजला, पण तिचा निर्धार पूर्णपणे जिवंत आहे. आयएएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न आहे. कैफीने ‘इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड' मध्ये 12वीमध्ये 95.6% मार्क्स मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. 10वीमध्येही कैफीने 95.2% मार्क्स मिळवत पहिला क्रमांक मिळवला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कैफीनंतर सुमंत पोद्दारने 94% मार्कांसह दुसरा आणि गुरसरण सिंगने 93.6% मार्कांसह तिसरा क्रमांक मिळवला. तर दहावीच्या परीक्षेत सनी कुमार चौहानने 86.2% मार्क्स मिळवत अव्वल स्थान पटकावलं. संस्कृती शर्माने 82.6% सह दुसरा आणि नीतिकाने 78.6% सह तिसरा क्रमांक पटकावला आहे.
शिक्षणासाठी अनेक आव्हाने
‘इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड'मधील अंध विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठं आव्हान अभ्यासासाठी साहित्य जमा करणं होतं. ऑडिओ बुक्सची कमतरता आणि ब्रेल लिपीतील पुस्तकांची मर्यादित उपलब्धता यामुळे विद्यार्थ्यांना यूट्यूब आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागला.
या अनुभवाबद्दल सांगताना सुमंत म्हणाला की, 'मी काटेकोर वेळापत्रक पाहिलं नाही. मला वाटेल तसा अभ्यास करायचो, अन्य वेळा मित्रांसोबत क्रिकेट खेळत असे.ऑडिओ बुक्स आणि यूट्यूबने खूप मदत केली. खारडला राहणाऱ्या गुरसरण सिंगने सांगितलं की, हिंदी माध्यमाचा विद्यार्थी असल्यामुळे ऑडिओ बुक्स मिळणं आणखी कठीण झालं होतं. अनेकदा मला इतरांकडून पुस्तकं रेकॉर्ड करून घ्यावी लागली, पण या अडचणींमुळे माझा निर्धार आणखी भक्कम झाला.
( नक्की वाचा : SSC Result : वडापाव विक्रेत्या महिलेनं 32 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा, परिस्थितीवर मात करत मिळवलं यश )
कैफीची वडील शिपाई आहेत
17 वर्षांच्या कैफीची गोष्ट कोणत्याही प्रेरणेपेक्षा कमी नाही. ती फक्त तीन वर्षांची असताना शेजाऱ्यांनी कौटुंबिक वादातून कैफीवर ॲसिड फेकले. या हल्ल्यात तिची दृष्टी कायमची गेली. कैफीवर अनेक वर्षे दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात आले. 2016 मध्ये तिने शाळेत प्रवेश घेतला. 2018 मध्ये तिचे आई-वडील चांगल्या शिक्षणासाठी तिला घेऊन चंदीगडला आले. कैफीचे वडील पवन हरियाणा सचिवालयात शिपाई आहेत आणि आई सुमन गृहिणी आहे. दोघांनीही 5वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.
IAS होण्याचं स्वप्न
कैफीला ती 10 वर्षांची असताना दुसरीतून थेट सहावीममध्ये प्रवेश मिळाला होता. कैफीने सांगितलं की सुरुवातीला सहावीचा अभ्यास करणं कठीण होतं, पण मी स्वतः अभ्यास केला आणि हळूहळू सगळं सोपं झालं. आता माझं स्वप्न आयएएस अधिकारी बनण्याचं आहे. मी रोज सकाळ-संध्याकाळ 2-3 तास अभ्यास करत होते.
( नक्की वाचा : SSC Result : देशसेवा केल्यानंतर अपूर्ण स्वप्न केलं पूर्ण, माजी सैनिक मुलासोबत झाले दहावी पास )
कैफीला न्याय कधी मिळणार?
कैफीसोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध तिच्या आई-वडिलांनी 2018 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2020 पासून हा खटला प्रलंबित आहे. कैफी म्हणाली, आमची लढाई अजूनही सुरू आहे. मी अभ्यासात चांगली कामगिरी करत आहे, जेणेकरून एक दिवस मी स्वतः माझ्या खटल्यासाठी आवाज उठवू शकेन आणि न्याय मिळवू शकेन. अडचणींनंतर हार मानण्याऐनजी त्यांचा सामना करण्याचं धैर्य दाखवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कैफीचं यश हे प्रेरणा देणारं आहे.