प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा होत आहे. सांस्कृतिक एकतेचे प्रतिक असलेल्या या महाकुंभमेळ्यात भाविकांची सेवा करण्याचा संकल्प अदाणी समूहाने केला आहे. इस्कॉननंतर अदाणी समूह गीता प्रेस बरोबर सहकार्य करणार आहे. त्या नुसार या महाकुंभमेळ्यात अदाणी समूहा तर्फे भाविकांना गीता प्रेस मार्फत प्रकाशित करण्यात आलेले आरती संग्रहाचे वाटप केले जाणार आहे. जवळपास 1कोटी भाविकांना हे आरती संग्रह मोफत दिले जाणार आहेत. भारतीय संस्कृतीच्या रक्षण, संवर्धन आणि प्रसारासाठी काम करणाऱ्या गीता प्रेसचे पदाधिकारी आणि अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांच्यात याबाबत अहमदाबादमध्ये चर्चा झाली. याबाबतची माहिती गौतम अदाणी यांनी X वर दिली.
कुंभमेळा हा भारतीय संस्कृती आणि धार्मिक आस्थेचा महायज्ञ असल्याचे यावेळी गौतम अदाणी यांनी सांगितले. आमच्यासाठी ही एक समाधानाची बाब आहे की आम्ही प्रतिष्ठीत संस्था गीता प्रेस बरोबर सहकार्य करत आहे. त्या माध्यमातून आम्ही आरती संग्रहाच्या जवळपास 1 कोटी प्रती कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांना मोफत देणार आहोत. सनातन साहित्याच्या माध्यमातून गेल्या 100 वर्षापासून देशाचे सेवा करणाऱ्या गीता प्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटून आनंद झाल्याचे गौतम अदाणी यावेळी म्हणाले. त्यांच्या चांगल्या कामासाठी आपल्याला त्यांचे आभार मानण्याचे भाग्य लाभले आहे असंही त्यांनी सांगितलं. निस्वार्थ सेवाभाव आणि संस्कृतीचे रक्षण म्हणजे एक प्रकारे राष्ट्रप्रेम असल्याचे ही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की "सेवा साधना आहे, सेवा प्रार्थना आहे, आणि सेवा हिच परमात्मा आहे."
सनातन धर्माची सेवा करणाऱ्या गीता प्रेस बरोबर आता अदाणी समूह आरती संग्रह प्रकाशनाच्या कामात सहभागी झाला आहे. गीता प्रेस आपली 100 वर्षाचा प्रवास पूर्ण करून दुसऱ्या शताब्दीच्या तयारीसह पुढे चालला आहे. गीता प्रेसनेही अदाणी समूहाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतूक केले आहे. 'पवित्र भावनेनं एकत्र काम करणाऱ्या प्रत्येक समूहा प्रती गीताप्रेस अत्यंत आदर व्यक्त करत आहे. शिवाय त्यांना सन्मानही करते. आम्हाला विशेष आनंद आहे की अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी हे सनातन संस्कृतीच्या सेवेचा संकल्प करत आहेत. त्यातून ते या सांस्कृतीक आणि आध्यात्मिक यात्रेत सहभागी झाले आहेत. अदाणी यांचे हे सहकार्य दिर्घकाळ राहील असा आम्हाला विश्वास आहे असंही गीता प्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यातून सनातन धर्माच्या प्रचार, प्रसार आणि भारताला विश्वगुरू बनवण्याच्या संकल्पनेसाठी उर्जा देणारे ठरणार आहे.
ही बैठक अहमदाबादमध्ये झाली. या बैठकीत गौतम अदाणी यांच्या बरोबर गीता प्रेसचे महत्वाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यात जनरल सेक्रेटरी नीलरतन जी चांदगोठिया, ट्रस्टी देवी दयालजी अग्रवाल, सदस्य ट्रस्ट बोर्ड राम नारायण चांडक, लालमणि तिवारी आणि आचार्य संजय तिवारी उपस्थित होते.