Diwali 2025 : दिवाळीमुळे घरोघरी आनंदाचं वातावरण आहे. दिवाळीनिमित्ताने कर्मचाऱ्यांना कंपनीकडून भेटवस्तू आणि बोनस दिला जातो. मात्र बोनस न देणं कंपनीसाठी महागात पडलं आहे. रविवारी रात्री आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर गोंधळ उडाला. दिवाळीचा बोनस न मिळाल्याने नाराज झालेल्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांनी सर्व टोल गेट उघडले आणि आंदोलन केले. यादरम्यान हजारो वाहनं टोल कर न भरता एक्सप्रेसवेवरून निघून गेली. ज्यामुळे कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
बोनस न मिळाल्याने कर्मचारी संतापले...
ही घटना आग्रा-लखनऊ एक्सप्रेसच्या टोल प्लाझा-२१ वर झाली. श्रीसांई आणि दातार कंपनीअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला नाही. ज्यामुळे कर्मचारी संतापले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना बोनस दिलं जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात असं झालं नाही. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री विरोध करीत टोलचा गेट उघडला आणि टोल प्लाझावर आंदोलन पुकारलं.
दहा तास चाललं आंदोलन, लाखोंचं नुकसान
बोन दिला जात नाही तोपर्यंत कामावर परतणार नसल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आपल्या मागणीवर कायम होते. कर्मचाऱ्यांचं आंदोलन तब्बल दहा तास सुरू होतं. ज्यामुळे एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या हजारो गाड्यांनी टोल दिलं नाही. यादरम्यान कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.