Ahmedabad Dosa Food Poisoning : एका हसत्याखेळत्या कुटुंबासाठी रात्रीचं साधं जेवण काळ ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. रात्रीच्या जेवणात आवडीचा पदार्थ बनवला, सर्वांनी तो आनंदाने खाल्ला, पण काही तासांतच होत्याचं नव्हतं झालं. दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू आणि आई-वडील मृत्यूशी झुंज देत असलेली ही अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा हा प्रकार इतका गंभीर आहे की, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
घरातील दोन चिमुकल्या मुलींना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. तर त्यांचे आई-वडील अद्यापही रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. एका छोट्याशा चुकीने किंवा कदाचित एका दूषित पदार्थाने हे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे.
नेमकं काय घडलं त्या रात्री?
हे हृदयद्रावक प्रकरण गुजरात राज्यातील अहमदाबादमधील चांदखेडा परिसरात घडलं आहे. विमल प्रजापती असं या कुटुंबातील प्रमुखाचं नाव आहे. 1 एप्रिलच्या रात्री विमल यांनी घराजवळ असलेल्या आयओसी रोडवरील एका डेअरीतून डोसा बनवण्यासाठी तयार पीठ विकत आणलं होतं.
घरात आनंदाने डोसे बनवण्यात आले आणि कुटुंबाने ते आवडीने खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेल्या पिठाचे पुन्हा डोसे बनवून खाण्यात आले, पण त्यानंतर काही वेळातच संकटाला सुरुवात झाली.
( नक्की वाचा : Chandrapur News: चंद्रपुरात क्रिकेट स्पर्धेत मृत्यूचे तांडव ! मॅच सोडून जीव वाचवण्यासाठी पळत सुटले प्रेक्षक )
काही तासांतच दोन चिमुरड्यांचा अंत
डोसा खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्रास इतका वाढला की, विमल, त्यांची पत्नी भावना आणि त्यांच्या दोन मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं.
दुर्दैवाने, 3 महिन्यांच्या लहान मुलीचा उपचार सुरू असताना 4 एप्रिल रोजी मृत्यू झाला. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच, 5 एप्रिल रोजी त्यांच्या 4 वर्षांच्या दुसऱ्या मुलीनेही प्राण सोडला. सध्या मुलींच्या आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्रशासनाकडून नमुन्यांची तपासणी सुरू
या घटनेनंतर अहमदाबाद महानगरपालिकेचा अन्न विभाग आणि चांदखेडा पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अन्न अधिकारी डॉ. तेजस शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या डेअरीतून हे पीठ विकत घेतलं होतं, तिथले नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मुलींच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अहवालातूनच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
( नक्की वाचा : Illegal Statue: रात्रीच्या अंधारात पुतळा, सकाळी गावात राडा! राज्यात दंगली घडवणाऱ्या टोळीचा भयानक प्लॅन उघड )
डेअरी मालकाचा दावा काय?
दुसरीकडे, संबंधित डेअरीचे मालक केतन भाई यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी त्यांनी 100 किलोपेक्षा जास्त पिठाची विक्री केली होती. त्यांनी इतर ग्राहकांशी संपर्क साधला असता, कोणालाही असा त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. त्यामुळे हा त्रास पिठामुळेच झाला की घरात वापरलेल्या इतर कोणत्या पदार्थामुळे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. एका छोट्याशा आहारामुळे दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.