लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
Solapur Statue Controversy: महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा धोक्यात आणणारा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या महापुरुषांनी अखंड समाजाला एकत्र जोडले, त्याच महापुरुषांच्या नावाचा वापर करून राज्यात दंगली घडवण्याचे एक मोठे कारस्थान रचले जात होते. रातोरात सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारून दोन समाजांमध्ये वाद निर्माण करायचा आणि त्यातून आपला स्वार्थ साधायचा, अशी एक भयंकर कार्यपद्धती या टोळीने विकसित केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, त्याच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
जालन्याच्या शौर्य प्रतिष्ठानचा अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील हा या संपूर्ण टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. सोलापूर, बुलढाणा, परभणी, बीड आणि यवतमाळ यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये रातोरात छुप्या पद्धतीने पुतळे बसवण्याचे जे प्रकार घडले, त्यामागे याच टोळीचा हात असल्याचा आरोप आहे. सोलापूर पोलिसांनी अखेर बाळराजे आवारे याला अटक केली असून, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कशी होती या टोळीची कार्यपद्धती?
बाळराजे आवारे हा मूळचा जालन्याच्या अंबड तालुक्यातील नालेवाडी गावचा रहिवासी आहे. त्याने अंबडमधील महाकाळ गावात प्लॅस्टर आणि फायबरचे पुतळे बनवण्याचा एक कारखाना सुरू केला होता. मात्र, हा केवळ व्यवसाय नव्हता, तर त्यामागे एक मोठे षडयंत्र होते.
ही टोळी आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या गावात वातावरणनिर्मिती करायची. त्यानंतर गावातील तरुणांना भावनिक साद घालून, त्यांना चिथावणी देऊन विनापरवाना पुतळे बसवण्यासाठी तयार केले जायचे.
( नक्की वाचा : Parth Pawar: पार्थ पवारांना स्वकीयांनीच घेरलं; आई सुनेत्रा पवार नव्या चक्रव्युहातून मुलाला कसं बाहेर काढणार? )
आर्थिक आणि राजकीय जाळे
तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या 25 हजार ते 30 हजार रुपयांत तयार होणारा फायबरचा पुतळा ही टोळी गावकऱ्यांना 1 लाख ते 1.25 लाख रुपयांना विकायची. यासाठी मार्केटिंग आणि प्रसिद्धीसाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती. पुतळा बसवल्यानंतर निर्माण होणाऱ्या तणावाचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी केला जात होता. सोलापूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या 9 घटना घडल्या असून, त्यातील अनेक ठिकाणी हा मास्टरमाईंड स्वतः उपस्थित होता.
बाळराजे आवारे याच्या अटकेनंतर प्रशासनाने आता त्याच्या कारखान्याकडे मोर्चा वळवला आहे. अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाकाळ येथील त्याचा पुतळ्यांचा कारखाना सील करण्यात आला आहे. एनडीटीव्ही मराठीच्या टीमने या गावात जाऊन पाहणी केली असता, तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेकडो तयार पुतळे आढळून आले आहेत. दुसरीकडे, बाळराजे याच्या आई-वडिलांनी मात्र आपला मुलगा निर्दोष असून त्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचा दावा केला आहे.
( नक्की वाचा : Court Verdict : खाकीला फाशीचा डाग! बाप-लेकाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा, काय आहे प्रकरण? )
राजकीय षडयंत्राचा संशय
या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे एक मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ही टोळी जाणीवपूर्वक काम करत होती, असा आरोप त्यांनी केला आहे.
या टोळीच्या मागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का, याचा शोध घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये जे संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्याचा फायदा उचलणाऱ्या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world