जाहिरात

Vijay Rupani : अहमदाबाद विमान अपघातामध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचं निधन

Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादहून लंडनच्या जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाला झालेल्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले आहे.

Vijay Rupani : अहमदाबाद विमान अपघातामध्ये गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचं निधन
Vijay Rupani : विजय रूपाणी गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री होते. त्यांनी 2016 ते 2021 या काळात हे पद सांभाळले.
मुंबई:

Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादहून लंडनच्या जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाला झालेल्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले आहे. ते या विमानाने लंडनला जात होते. केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांनी विजय रूपाणी यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण 242 जण होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विजय रूपाणी यांचा प्रवास

माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारमधील येनगोन येथे झाला होता. त्यांच्या आईचे नाव मायाबेन आणि वडिलांचे नाव रमणीकलाल रूपाणी आहे. सात भावंडांमध्ये विजय सर्वात लहान होते. 1960 मध्ये म्यानमारमधील राजकीय अस्थिरतेमुळे त्यांचे कुटुंब राजकोट येथे स्थायिक झाले. 

विजय रूपाणी यांनी गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातून बीए आणि एलएलबीची पदवी घेतली. त्यांनी भाजपच्या महिला आघाडीच्या सदस्य अंजली यांच्याशी लग्न केले. त्यांना एक अभियंता मुलगा आणि एक विवाहित मुलगी आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे कार अपघातात निधन झाले आहे.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय? )
 

विजय रूपाणी गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री होते. त्यांनी 2016 ते 2021 या काळात हे पद सांभाळले. ते भारतीय जनता पक्षाकडून गुजरातच्या राजकोट पश्चिममधून आमदार होते. याशिवाय ते भाजपचे राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत.

विजय रूपाणी शिक्षणादरम्यानच भाजपच्या विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात होते. 1971 मध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. भाजपची स्थापना झाल्यापासून ते पक्षाशी संबंधित होते. ते आणीबाणीदरम्यान 11 महिने तुरुंगात होते. 1996 ते 1997 या कालावधीमध्ये ते राजकोटचे महापौर होते. 1998 मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव बनवण्यात आले. 2006 मध्ये ते गुजरात पर्यटन मंडळाचे अध्यक्ष झाले. 2006 ते 2012 दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते. 

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना नेणारं विमान कोसळलं, वाचा आत्तापर्यंतचे देशातील मोठे अपघात )
 

2013 मध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ते गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डाचे अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी राजकोट पश्चिममधून आमदारकीची निवडणूक जिंकली. त्याचवर्षी आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आले. 2016 मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले. 7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. 2017 मध्ये भाजपने गुजरातमध्ये निवडणूक जिंकली आणि रूपाणींना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आले.

विजय रूपाणी लंडनला का जात होते?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजय रूपाणींच्या पत्नी अंजली रूपाणी लंडनमध्ये आहेत आणि माजी मुख्यमंत्री त्यांना परत आणण्यासाठीच निघाले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com