Ahmedabad Plane Crash News : अहमदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? क्रॅश होण्यापूर्वी विमानातील पायलटनी काही संदेश दिला होता का? हे रहस्य आता उलगडणार आहे. कारण या विमानातील ब्लॅक बॉक्समधील सर्व डेटा आता मिळवण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही दिवसांपूर्वी सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले होते की, अपघातस्थळी सापडलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्सचा एक भाग खूप जास्त खराब झाल्यासारखा दिसत होता. हे कदाचित विमान क्रॅश झाल्यानंतर झालेल्या जोरदार आघातामुळे झाले असावे. याची तपासणी करण्यासाठी तो अमेरिका, ब्रिटन व्यतिरिक्त सिंगापूरला पाठवण्याचा विचार सुरू आहे. ब्लॅक बॉक्सच्या दुसऱ्या भागाची तपासणी भारतातीलच एका प्रयोगशाळेत केली जाऊ शकते.
ब्लॅक बॉक्सशी संबंधित काही महत्त्वाची माहिती
- 24 जून रोजी भारतीय वायुसेनेच्या (IAF) विमानाने ब्लॅक बॉक्स सुरक्षितपणे दिल्लीला आणला.
- पहिला ब्लॅक बॉक्स डीजी, एएआयबी (DG, AAIB) द्वारे आणला गेला आणि दुपारी 2 वाजता एएआयबी लॅब, दिल्ली येथे पोहोचला.
- दुसरा ब्लॅक बॉक्स एएआयबीच्या दुसऱ्या टीमने आणला आणि संध्याकाळी 5:15 वाजता लॅबमध्ये पोहोचला.
- 24 जून रोजी संध्याकाळी डीजी, एएआयबी यांच्या नेतृत्वाखाली एएआयबी आणि एनटीएसबी (NTSB) च्या तांत्रिक टीमने डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली.
- 25 जून रोजी, पहिल्या ब्लॅक बॉक्सचे मेमरी मॉड्यूल यशस्वीरित्या ॲक्सेस करण्यात आले आणि डेटा डाउनलोड करण्यात आला.
- आता दोन्ही ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण केले जात आहे, जेणेकरून अपघात कसा झाला आणि त्याची कारणे काय होती हे शोधता येईल.
- एअर इंडिया फ्लाइट AI-171 विमान क्रॅश प्रकरणात ब्लॅक बॉक्स खूप महत्त्वाचा मानला जात आहे.
- ब्लॅक बॉक्सचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) असे दोन भाग मिळाले आहेत.
- एक भाग 13 जून रोजी अपघातस्थळावरील एका इमारतीच्या छतावरून मिळाला, तर दुसरा भाग 16 जून रोजी ढिगाऱ्यातून मिळाला.
या प्रकरणात, एएआयबीने आंतरराष्ट्रीय नियमांनुसार तज्ञांची एक टीम गठित केली आहे. या टीमचे नेतृत्व डीजी, एएआयबी करत आहेत. यामध्ये एव्हिएशन मेडिसिन तज्ञ, एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) अधिकारी आणि अमेरिकेच्या एनटीएसबीचे (जे विमान बनवणाऱ्या देशाची सरकारी तपासणी संस्था आहे) प्रतिनिधी देखील समाविष्ट आहेत.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'या' 3 अधिकाऱ्यांना तातडीनं काढा, DGCA चे Air India ला निर्देश )
अहमदाबादहून 12 जून रोजी लंडनसाठी उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांमध्ये एअर इंडियाचे एआय-171 विमान क्रॅश झाले होते. ड्रीमलायनर विमानांच्या ढिगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला होता. याचे दोन भाग असतात: कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर). त्यांना एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स असे म्हणतात. याच ब्लॅक बॉक्समधून अपघाताच्या कारणांबद्दल ठोस माहिती मिळू शकते. या ब्लॅक बॉक्समध्ये उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांतील हलचाल जसे की उंची, वेग आणि कॉकपिटमध्ये झालेली बातचीत याची माहिती रेकॉर्ड होत असते.