अहमदाबाद विमान अपघातातील आजी आणि नातीची हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. या दोघी अपघाताच्या काही तास आधी एकत्र होत्या. त्या दोघी खूप आनंदी होत्या. आजी आपल्या हाताने नातीला भरवत होती. नातही मोठ्या प्रेमाने आजीला भरवत होती. हा व्हिडीओ शुट केला गेला होता. काही तासांनंतर त्यांच्यासोबत जे घडले त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. ही कहाणी आहे बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील कँटीनमध्ये काम करणाऱ्या सरलाबेन आणि त्यांची नात आध्या यांची. अहमदाबाद विमान अपघातात सरलाबेन आणि आध्या या दोघींचाही मृत्यू झाला आहे. या दोघींच्या निधनाने कुटुंब दुख:त बुडाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहमदाबाद विमान अपघाताला सात दिवस उलटून गेले आहेत. परंतु, अजूनही अनेक कुटुंबांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या मृतदेहांची प्रतीक्षा आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह आणि कँटीनवर कोसळलेल्या विमानामुळे सरलाबेन आणि त्यांची नात आध्या यांचाही मृत्यू झाला. त्याच्याही मृतदेहाची प्रतिक्षा आणि ओळख त्यांच्या नातेवाईकांना करायची होती. एक आठवड्यानंतर त्या आजी आणि त्यांची नात यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ज्यावेळी हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले त्यावेळी त्यांच्या संयमाचा बांध फूटला.
गेल्या दहा वर्षांपासून सरलाबेन येथे स्वयंपाक करत होत्या. अपघातावेळी त्यांची नात आध्याही त्यांच्यासोबत होती. विमान कोसळण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांनी एक व्हिडिओही बनवला होता. एनडीटीव्हीने सरलाबेन यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सात दिवसांनंतर आजी-नातीचा डीएनए जुळला. त्यांच्या मुलगा, सून आणि एक नातू 10 मिनिटांपूर्वीच वसतिगृहातून बाहेर पडले होते. त्यामुळे या अपघातात त्यांचे प्राण वाचले.
सरलाबेन यांच्या कुटुंबाला विमान अपघाताची माहिती मिळताच ते धावत वसतिगृहाजवळ पोहोचले. पण त्यावेळी सर्वकाही जळत होते. त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आपली आई सरलाबेन आणि मुलगी आध्या यांच्याबद्दल काहीच माहिती न मिळाल्याने कुटुंबीय थेट रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांनी त्यांचे डीएनए नमुने दिले. सात दिवसांनंतर डीएनए जुळले आणि कुटुंबाला दोन्ही मृतदेह सुपूर्द करण्यात आले.