केंद्र सरकारनं अजित डोवाल यांची (NSA Ajit Doval) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केलीय. कॅबिनेट नियुक्ती समितीनं पीके मिश्रा (PM Mishra) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केलंय. पंतप्रधान मोदींच्या गेल्या दोन टर्ममध्येही डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. ते जगभरात भारताचे 'जेम्स बाँड' म्हणून प्रसिद्ध आहेत.
केरळ केडरचे IPS
डोवाल यांचा जन्म 1945 साली तत्कालीन संयुक्त प्रांतामध्ये (आत्ताचे उत्तराखंड) झाला. त्यांचे वडील जीएल डोवाल भारतीय लष्करात अधिकारी होते. अजित डोवाल यांनी सुरुवातीचं शिक्षण अजमेर मिल्ट्री स्कूलमध्ये घेतलं. आग्रा विद्यापीठातून 1967 साली त्यांनी अर्थशास्त्राचे पद्व्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं. अजित डोवाल 1968 मध्ये केरळ केडरचे IPS म्हणून निवडले गेले. ते मिझोराम, पंजाब आणि काश्मीरमधील दहशतवाद विरोधी मोहिमेत सक्रीय होते.
अजित डोवाल यांचा इतिहास मोठा विलक्षण आहे. त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून अनेक ऑपरेशन यशस्वी केले. त्यांनी भाजपा सरकार इतकंच काँग्रेस सरकारमध्येही काम केलं आहे. अत्यंत गुंतागुंतीचे ऑपरेशन्समध्ये त्यांनी काम केलं आहे. यामधील सर्वात पहिलं नाव आहे 'मिझो करार' यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
कीर्ती चक्रानं सन्मान
सिक्किमला राज्याचा दर्जा देण्यात डोवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. 1984 साली देशात दंगे झाले त्यावेळी ते पाकिस्तानमध्ये होते. ते तिथं गुप्तेहर म्हणून काम करत होते. 1988 साली झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्येही त्यांचं मोलाचं योगदान होतं. ते तीन महिन्यांपर्यंत पाकिस्तानी एजंट म्हणून दहशतवाद्यांसोबत सुवर्ण मंदिरात लपले होते, असं सांगितलं जातं. त्यांच्या नेतृत्त्वाखालीच NSG चं ऑपरेशन यशस्वी झालं. या कामगिरीसाठीच त्यांचा कीर्ती चक्र देऊन गौरव करण्यात आला.
जम्मू काश्मीरमध्ये 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यानंतर 1995 साली पहिल्यांदाच निवडणुका झाल्या होत्या. 1999 साली इंडियन एअरलाईन्सच्या विमानांनी दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. त्यावेळी दहशतवाद्यांशी बोलणी करण्यासाठी ते कंदहारला गेले होते. ते त्यावेळी विमानातही गेले होते. त्यांच्या प्रयत्नातूनच सर्व प्रवाशांची मुक्तता झाली.
स्वतंत्र परराष्ट्र धोरणामध्ये योगदान
नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळी डोवाल पुन्हा चर्चेत आले. त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. नेशन फर्स्ट ही त्यांची नेहमीची भूमिका आहे. त्यांनी राष्ट्रहिताला नेहमी प्राधान्य दिलंय. त्यामुळेच त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोवाल 2014 ते 2019 या कालावधीमध्ये अनेक यशस्वी ऑपरेशन्स केली. इराकमध्ये फसलेल्या नर्सना भारतामध्ये परत आणणे हे त्यांचं पहिलं ऑपरेशन होतं. भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाचं योगदान होतं. अमेरिका आणि रशियाशी संतुलन ठेवून पॉलिसी बनवण्यातही डोवाल यांनी दिशानिर्देश दिले.
सर्जिकल स्ट्राईक
पंतप्रधान मोदी यांची जागतिक स्तरावरील प्रतिमानिर्मितीमध्ये डोवाल यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी पडद्याआड राहून सर्व सूत्रं चालवली. उरीमधील सर्जिकल स्ट्राईक, पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील हल्ला याचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये त्यांचा मेन रोल होता.
पाकिस्तानमध्ये खास मिशन
अजित डोवाल यांनी पाकिस्तानमध्येही गुप्तहेर म्हणून काम केलं आहे. त्यांना एका खास मिशनसाठी पाकिस्तानात पाठवण्यात आलं होतं, असं सांगितलं जातं. पाकिस्तानमध्ये त्यांनी अनेक कामं केली. तिथं त्यांनी रिक्षा देखील चालवली. दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कृत्यांवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यासाठी डोवाल पाकिस्तानमध्ये गेले होते.
डोवाल यांनी सांगितला होता पाकिस्तानातील किस्सा
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानमधील एक किस्सा सांगितला होता. ते पाकिस्तानमध्ये होते त्यावेळी एके दिवशी मशिदीच्या पायऱ्या उतरताना एका व्यक्तीनं त्यांना पकडलं. तू हिंदू आहेस का? असा प्रश्न त्यांनी डोवाल यांना विचारला. डोवाल यांनी नाही, असं उत्तर दिलं. त्यानंतरही त्या व्यक्तीचं समाधान झालं नाही.
( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
त्या व्यक्तीनं डोवाल यांना एका खोलीत नेलं आणि दरवाजा बंद केला. पाकिस्तानातील त्या व्यक्तीनं डोवाल यांना विचारलं तुझ्या कानात छिद्र का आहे? हिंदू पालक त्यांच्या मुलांचे कान टोचतात. तू कानाची छिद्रं बुझवं अन्यथा फसशील. त्यानंतर डोवाल यांनी कानाची प्लॅस्टिक सर्जरी केली.