Ayodhya Blast: उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यामध्ये एक भीषण स्फोटाची घटना घडली आहे. येथील नगर पंचायत भदरसा भरतकुंड येथील महाराणा प्रताप वॉर्डमधील पगलाभारी गावात हा शक्तिशाली स्फोट झाला, ज्यात एक संपूर्ण घर कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. जिल्हा रुग्णालय, अयोध्या येथील आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाठक यांनी सांगितले की, "जळालेल्या अवस्थेत 5 जणांना रुग्णालयात आणण्यात आले होते, ज्यात 3 मुले आणि 2 प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी आणखी लोक अडकलेले असण्याची शक्यता असून, त्यांना अद्याप येथे आणलेले नाही."
पोलीस आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) गौरव ग्रोव्हर यांनी सांगितले की, "गावाबाहेरील शेतजमिनीवर असलेल्या एका घरात मोठा स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे."
बचावकार्यासाठी ढिगारा हटवण्यासाठी उत्खनन (Excavation) मशीनचा वापर केला जात आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आजूबाजूची घरे खबरदारीचा उपाय म्हणून रिकामी करण्यात आली आहेत. तसेच, नागरिकांनी बचावकार्यात अडथळा न आणता घटनास्थळापासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
( नक्की वाचा : Kanpur Blast: कानपूरमध्ये मोठा 'ब्लास्ट'; दाट वस्तीतील स्फोटाने बाजारपेठ हादरली )
पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सध्या या बचावकार्याच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. या स्फोटाचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.