अयोध्या येथील भव्य राम मंदिर जवळपास तयार झाले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, राम मंदिर बांधकामासाठी भक्तांनी तब्बल मोठ्या प्रमाणात दान केले आहे. हे दान किती केले आहे याची माहिती ही त्यांनी सार्वजनिक केली आहे. त्यानुसार तब्बल 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त दान राम भक्तांनी दिले आहे. मंदिराच्या प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे 1800 कोटी रुपये आहे. म्हणजेच खर्चाच्या दुप्पट दान मिळाले आहे. आत्तापर्यंत जवळपास 1500 कोटी रुपयांचे बिल तयार झाले आहे.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष मिश्र यांनी सांगितले की, 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याचे मुख्य अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. पंतप्रधान मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमासाठी 2022 नंतर दान देणाऱ्या सर्व दानशूरांना आमंत्रित करण्यात आले आहे. बुधवारी या ध्वजारोहण सोहळ्याची रंगीत तालीम करण्यात आली. नृपेंद्र मिश्र यांच्या मते, मुख्य मंदिराच्या आत एका वेळी 5000 ते 8000 भाविक दर्शन घेऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शन मार्गातून (दक्षिणी निकास दरवाजापर्यंत) जाण्यासाठी 20 मिनिटे लागतील. तर सुग्रीव किल्ल्यापर्यंतचा संपूर्ण मार्ग पूर्ण करण्यासाठी 40 मिनिटे लागतील. ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीसाठी आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी समितीची बैठक झाली. यावेळी समिती पंतप्रधानांना राम मंदिर परिसरातील शेषावतार मंदिर, कुबेर टीला आणि सप्त मंडपम यासह 70 एकर परिसरात असलेल्या ऋषी-मुनींच्या आश्रमांची भित्तीचित्रे पाहण्यासाठी वेळ काढण्याची विनंती करणार असल्याचं यावेळी मिश्र यांनी सांगितलं. सद्भावना वाढवण्यासाठी या सोहळ्याला 8000 हून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.