भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. देशात एकूण 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी या दिवशी निवडणूक होणार आहेत.
यावेळी चार राज्यांच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 12 राज्यातील 25 विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 28 मार्च 2024 रोजी अधिसूचना जारी करुन राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे, त्यांचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करणे, एक्झिट पोलचे निकाल जाहीर करणे यावर प्रतिबंध राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासांच्या कालावधीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील पाच टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात निवडणूक होणार...
दिनांक | टप्पा | जिल्हे |
19 एप्रिल | पहिला टप्पा | रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर |
26 एप्रिल | दुसरा टप्पा | बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी |
7 मे | तिसरा टप्पा | रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले |
13 मे | चौथा टप्पा | नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड |
20 मे | पाचवा टप्पा | धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ |