बांगलादेशात अनियंत्रित हिंसाचार अद्यापही सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू झालेलं येथील आंदोलन हिंसक झालं. आंदोलन हाताबाहेर गेल्याने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून भारतात पळून यावं लागलं होतं. बांगलादेशातील सत्ता लष्कराने आपल्या हाती घेतली आणि हंगामी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मोहम्मद युनूस यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदी नेमण्यात आलं. हे सगळं होत असतानाही बांगलादेशातील हिंसाचार थांबलेला नाहीये. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टी शोधून काढत त्यांची नासधूस करणे सुरू केलंय. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रेहमान यांचे भलेमोठे पुतळेही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या दंगेखोरांनी एक मूर्ती तोडलीय जी पाहून पाकिस्तानची जाम टरकायची.
(नक्की वाचा: पाकिस्तानच्या इतिहासातील लाजीरवाणी घटना, माजी ISI प्रमुखांचं होणार कोर्ट मार्शल)
1971च्या युद्धात बांगलादेश स्वतंत्र झाला. या युद्धात पाकिस्तानला असा हादरा बसला होता की तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहिला. 1971 च्या या युद्धात शहीद झालेल्यांच्या आठवणीप्रीत्यर्थ एका मूर्ती शिल्पाची निर्मिती करण्यात आली होती. पाकिस्तानी सैन्याचे मेजर जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी हे भारतीय सैन्य आणि बांगलादेश मुक्ति वाहिनीसमोर आत्मसमर्पण करत असल्याच्या कागदपत्रांवर सही करताना या मूर्ती शिल्पामध्ये दाखवण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन कमांडीग एन ऑफिसर जगजीत सिंग अरोरा यांच्यासमक्ष या कागदपत्रांवर सही केली होती. पाकिस्तानवर लागलेला हा बट्टा त्यांना आजवर कधीही पुसता आलेला नाही. यामुळे या घटनेची आठवण करून देणारे मूर्ती शिल्प पाहिले की पाकिस्तान्यांची जाम टरकते. बांगलादेशने हा क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी ही मूर्ती बनवून घेतली होती. या मूर्तीची दंगेखोरांनी नासधूस केली आहे.
( नक्की वाचा : सेंट मार्टिन बेटाचं महत्त्व काय? जे अमेरिकेला देण्यास नकार दिल्यानं शेख हसीनांनी गमावली खुर्ची! )
1971 सालचे भारत-पाकिस्तान युद्ध
1971 साली झालेल्या या युद्धाला भारत आणि पाकिस्तानातील तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. भारत आणि पाकिस्तानातील हे युद्ध 3 डिसेंबर 1971 ला सुरू झाले होते. 16 डिसेंबरला पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकले होते. पाकिस्तानी वायू दलाने भारताच्या हवाई तळांवर हल्ले केले होते. यानंतर भडकलेल्या बारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले आणि त्यांना चहूबाजूने घेरून त्यांना शरण येण्यास भाग पाडले होते. 93 हजार सैनिकांसह पाकिस्तानी सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली होती.
(नक्की वाचा: 'मी पुन्हा येईन' शेख हसीना यांचे शेवटचे भाषण का झालं नाही सार्वजनिक?)
कोण करतंय हा विध्वंस?
बांग्लादेशात भडकलेल्या हिंसाचाराला जमात ए इस्लामी हा तिथला पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. हंगामी सरकारमध्येही या पक्षाला स्थान देण्यात आले आहे. या पक्षाचे पाकिस्तानशी पक्के संबंध आहेत. याच पक्षाने बांगलादेशच्या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याला साथ दिली होती. जमात ए इस्लामीने 1971च्या युद्धाच्या आणि बांगलादेश स्वातंत्र्याशी निगडीत सगळ्या खुणा पुसून टाकण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या या अस्थिरतेमागेही पाकिस्तानचाही हात असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर हल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. हिंदुंचे मंदिर, हिंदू कुटुंब लक्ष्य करण्यात येत आहे. हिंदूंवर हल्ले केल्याच्या 205 हून अधिक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत.