Bank Holidays In September 2025: ऑगस्ट महिना संपत आला आहे. नवा महिना जवळ आला की त्यात किती सुट्ट्या आहेत, किती दिवस बँका बंद राहणार याची सर्वसामान्यांना उत्सुकता असते. सप्टेंबर महिन्यातही बरेच सणवार, उत्सव असल्याने त्याची सुट्टी असणार का याचीही उत्सुकता असते. सप्टेंबर महिन्यात ओणम, ईद-ए-मिलाद आणि नवरात्र येत आहेत, यामुळे सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे प्रत्येक महिन्यातील बँकांना असलेल्या सुट्टीचे कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात येते. या कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यात देशभरातील बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. यामध्ये आठवड्याच्या सुट्ट्या आणि सणांमुळे मिळणाऱ्या प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
नक्की वाचा: 1 सप्टेंबरपासून तुमच्या खिशावर थेट परिणाम! GST, LPG आणि चांदीच्या नियमांमध्ये मोठे बदल
बँका कधी बंद असणार ?
आरबीआयने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीव्यतिरिक्त नियमानुसार बँका महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात, तसेच प्रत्येक रविवारीही बँकांना सुट्टी असते. त्यानुसार, या महिन्यातील 7, 14, 21 आणि 28 सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील. याव्यतिरिक्त, देशातील विविध राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या स्थानिक सणांमुळेही बँकांना सुट्ट्या आहेत. झारखंडमध्ये 'कर्मा पूजा', केरळमध्ये 'ओणम', तर अनेक राज्यांमध्ये 'ईद-ए-मिलाद' आणि 'नवरात्री' निमित्त बँकांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
बँका बंद असल्याने कोणत्या सेवा मिळणार नाहीत ?
या सुट्ट्यांमध्ये बँकांच्या शाखांमधील सामान्य व्यवहार, जसे की पैसे जमा करणे किंवा काढणे, धनादेश वठवणे, कर्ज अर्ज स्वीकारणे, इत्यादी सेवा बंद राहतील. त्यामुळे, ग्राहकांनी बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्यातील सुट्ट्यांची यादी पाहूनच नियोजन करणे आवश्यक आहे. जे बँक ग्राहक ऑनलाईन बँकींग करतात, त्यांना बँकेचे व्यवहार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय (UPI) सेवा, एटीएम आणि इतर ऑनलाइन सुविधा 24 तास सुरू राहतील. त्यामुळे तुम्हाला जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील किंवा ऑनलाइन बिल भरायचे असेल तर त्यात बँकेच्या सुट्ट्यांचा कोणताही अडथळा येणार नाही. बँकेमध्ये जाऊन कुठला व्यवहार करायचा असेल तर मात्र सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेमध्ये जाणे फायद्याचे ठरेल अन्यथा तुमची फेरी वाया जाण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा: भाविकांना दिलासा! 'साई नगरीत' पार्किंगचा प्रश्न मिटला, मंदिर समितीकडून खास व्यवस्था
सप्टेंबर 2025 मधील बँक हॉलिडेजची संपूर्ण यादी (Full List Of Bank Holidays In September 2025)
- सप्टेंबर 3 – झारखंडमध्ये करमा पूजा निमित्त सुट्टी
- सप्टेंबर 4 – केरळमध्ये पहिला ओणम निमित्त सुट्टी
- सप्टेंबर 5 – गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली, झारखंड आणि तेलंगणा येथे ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी निमित्त सुट्टी
- सप्टेंबर 6 – सिक्कीम आणि छत्तीसगडमध्ये ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी)/इंद्रजत्रा निमित्त सुट्टी
- सप्टेंबर 12 – जम्मू-काश्मीरमध्ये ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतरचा शुक्रवार म्हणून सुट्टी
- सप्टेंबर 13 – सर्व बँका महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बंद राहतील
- सप्टेंबर 22 – राजस्थानमध्ये नवरात्र स्थापना निमित्त सुट्टी
- सप्टेंबर 23 – जम्मू-काश्मीरमध्ये महाराजा हरी सिंह यांची जयंतीनिमित्त बँका बंद राहतील
- सप्टेंबर 27 – सर्व बँका चौथा शनिवार असल्याने बंद राहतील
- सप्टेंबर 29 – त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये महा सप्तमी/दुर्गा पूजा उत्सव
- सप्टेंबर 30 – त्रिपुरा, ओडिशा, आसाम, मणिपूर, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये महा अष्टमी/दुर्गा अष्टमी/दुर्गा पूजा उत्सव
- सप्टेंबर 7, 14, 21, 28 – देशभरात रविवार असल्यामुळे बँकांना सुट्ट्या