Himachal Pradesh Flood : हिमाचल प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मंडी, कांगडा, चंबा आणि कुल्लूसारख्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती खूपच गंभीर आहे. विशेषत: मंडीमध्ये ब्यास नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे आणि नदीकाठच्या भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. ड्रोनने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अनेक ठिकाणी नदीचे पाणी काठ ओलांडून वस्तींमध्ये शिरले आहे.
ऐतिहासिक मंदिराचा काही भाग पाण्याखाली
मंडीमधील ब्यास नदीच्या किनाऱ्यावर असलेले ऐतिहासिक पंजवक्त्र महादेव मंदिर देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर खूप जुने आहे आणि दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मंदिराचा मुख्य भाग आता पाण्याने वेढला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने आहे.
IMD ने जारी केला अलर्ट
हवामान विभागाने (IMD) मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाचे म्हणणे आहे की, पुढील 48 तास या भागांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने लोकांना नदी-नाल्यांच्या जवळ न जाण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
रस्ते आणि वीज-पाणी पुरवठा ठप्प
राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दोन राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 795 रस्ते मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. अनेक भागांमध्ये वीज आणि पाणी पुरवठाही खंडित झाला आहे. आतापर्यंत 956 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 517 पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु सततच्या पावसामुळे अडचणी वाढत आहेत.
( नक्की वाचा : बाबा, आम्ही वाचणार नाही… हर्षिल खोऱ्यातून आला शेवटचा फोन, उत्तरकाशीमधील ही कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी! )
शाळा-महाविद्यालये बंद, NDRF च्या टीम तैनात
मंडी, कांगडा, चंबा, बिलासपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
धोका कायम
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार, हिमाचल प्रदेशमध्ये मान्सून आणखी सक्रिय होऊ शकतो. या परिस्थितीत भूस्खलन, पूर आणि ढगफुटीसारख्या घटनांचा धोका कायम आहे. प्रशासनाने सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा आणि गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आहे.