Mamata banerjee: महाराष्ट्रापाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही भाषेवरून वाद सुरू होण्याची शक्यता आहे. या वादाची सुरुवात कोलकाता महानगरपालिकेने (Kolkata Municipal Corporation) जारी केलेल्या एका परिपत्रकामुळे झाली आहे. त्यात दुकानदार आणि इतर आस्थापनांच्या मालकांना त्यांच्या दुकानांच्या पाट्यांवर (signboard) बंगाली भाषेचा वापर करणे बंधनकारक केले आहे. हा आदेश जारी झाल्यानंतर शहरातील अनेक दुकानदारांनी त्यांच्या पाट्या बंगाली भाषेत बदलायला सुरुवात केली आहे.
30 सप्टेंबरपर्यंत आदेश लागू करण्याचे निर्देश
कोलकाता महानगरपालिकेने हा आदेश लागू करण्यासाठी सर्व दुकानदारांना या महिन्याच्या 30 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. असे न केल्यास कारवाई केली जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशनानंतर कोलकातातील सर्व दुकानांच्या पाट्या आता बंगाली भाषेत पाहायला मिळत आहे. पाट्या न लावणाऱ्यां विरोधात कडक कारवाईचे संकेत कोलकाता महापालिकेने दिले आहेत.
बंगाली भाषेचा गौरव टिकवून ठेवण्यासाठी निर्णय
पश्चिम बंगाल सरकारनुसार, त्यांनी हा निर्णय बंगाली भाषेची ओळख आणि गौरव टिकवून ठेवण्यासाठी घेतला आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन परिपत्रक शनिवारी जारी करण्यात आले आहे. यात स्पष्टपणे म्हटले आहे की, शहरातील सर्व दुकानांच्या पाट्यांवर बंगाली भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. जे बंगाली पाट्या लावणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
सर्वात वर बंगाली भाषा
या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कोलकाताच्या महापौरांच्या निर्देशानुसार, सर्व व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, नगरपालिका आणि इतर संस्थांनी त्यांच्या दुकानांच्या पाट्यांवर सर्वात वर बंगाली भाषेत लिहावे. बंगाली भाषेच्या खाली इतर भाषांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. निर्देशात स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणत्याही पाट्यांवर बंगाली भाषा इतर भाषांबरोबर नाही, तर सर्वात वर लिहिली जाईल.
महाराष्ट्रात खास करून मुंबईत मराठी पाट्यांचे आंदोलन गाजले होते. आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे आंदोलन छेडले होते. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही मराठी पाट्यांचे आंदोलन घेतले होते. त्यानंतर मुंबईतल्या सर्व दुकानांवरिल पाट्या या मराठीत कराव्या लागल्या होत्या. आता पश्चिम बंगालमध्येही त्याचे लोण पसरल्याचे दिसत आहे.