देशातील मोठ्या शहरांत प्रवाशांची सुरक्षा, विशेषतः महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा एक मोठा मुद्दा आहे. अनेक वेळा प्रवास करताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात आता एक असा ऑटो समोर आला आहे जो संपूर्ण पणे सुरक्षित आहेच पण तो वेगवेगळ्या सोयी सुविधांनी ही युक्त आहे. हा साधासुधा ऑटो नसून तो एक सुपर ऑटो आहे. त्याचे आकर्षण सध्या सर्वांनाच आहे. हा खास ऑटो बंगळूरूच्या रस्त्यावर पाहायला मिळतोय. हा ऑटो प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी देतो. ही हमी पूर्ण करण्यासाठी या ऑटोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल चार्जिंग प्लग, मोफत वाय-फाय, टीव्ही स्क्रीन, सॅनिटरी पॅड आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. साधारणपणे लोक कमी खर्चात आपल्या जागेवर पोहोचण्यासाठी ऑटोने प्रवास करतात. पण आता या व्हायरल सुपर ऑटोचे आकर्षण इतके वाढले आहे की, अनेक प्रवासी खास याच ऑटोमधून प्रवास करणे पसंत करतात.
सुपर ऑटोमध्ये प्रवाशांसाठी खास सुविधा
या ऑटोमध्ये प्रवासासाठी मोफत वाय-फाय (Wi-Fi), टीव्ही स्क्रीन आणि कन्नड शिकण्याची पुस्तके यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. बंगळूरूचा हा सुपर ऑटो त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे सध्या चर्चेत आहे. या ऑटोच्या मालकाने, मणिवेल यांनी हा ऑटो एखाद्या नववधूप्रमाणे सजवला आहे. ऑटोमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, वाय-फाय, टीव्ही स्क्रीन, फॅन यांसारख्या सुविधांसह, काही विशिष्ट प्रवाशांसाठी मोफत प्रवासाचा पर्यायही आहे. एनडीटीव्हीने या ऑटोच्या सुविधांची पाहणी केली. ऑटो चालवणारे मणिवेल तसेच प्रवास करणाऱ्या काही मुलींशी यावेळी संवाद साधला.
'100 टक्के सुरक्षिततेची गॅरंटी'
ऑटो मालक मणिवेल यांनी त्यांच्या ऑटोला 'सुपर ऑटो' असे नाव दिले आहे, ज्यावर 'मोफत प्रवास' (Free Travel) चा पोस्टरही लावला आहे. त्यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, त्यांच्या सुपर ऑटोमध्ये प्रवाशांना 100 टक्के सुरक्षितता मिळते. "विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मी सर्व व्यवस्था केली आहे," असे ते म्हणाले. या ऑटोतून प्रवास करणाऱ्या महिलांनीही हा अनुभव सुरक्षित आणि आनंददायी होता असं सांगितलं. शिवाय यातून प्रवास करायला ही मजा आली असं मुली आणि महिलांनी एनडीटीव्हीला सांगितलं.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
प्रेग्नेंट महिला आणि डायलिसिस रुग्णांसाठी मोफत प्रवास
सुपर ऑटो गर्भवती महिला (Pregnant Women) आणि डायलिसिसच्या रुग्णांना 10 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करण्याची सुविधा देतो. याबद्दल मणिवेल यांनी सांगितले, "माझी पत्नी जेव्हा गर्भवती होती, तेव्हा माझ्याकडे बाईक देखील नव्हती. माझे घर एका गल्लीत असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी खूप अडचणी आल्या होत्या. म्हणूनच मी माझ्या ऑटोमधून गर्भवती महिलांना 10 किमी पर्यंत मोफत प्रवास देतो." डायलिसिसच्या रुग्णांना मोफत प्रवास देण्याबद्दल विचारले असता, मणिवेल यांनी सांगितले की त्यांचा एक मित्र डायलिसिसच्या उपचारादरम्यान मरण पावला होता. त्याच्या आठवणीत मी डायलिसिसच्या रुग्णांना मोफत प्रवासाची सुविधा देतो. ऑटोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही या 'सुपर ऑटो'मधील सुविधांची खूप प्रशंसा केली.