Bharat Taxi Service: देशभरात ओला, उबेरची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केंद्रीय सहकार विभाग आता टॅक्सी सेवा क्षेत्रातही प्रवेश करणार आहे. देशातील आठ प्रमुख सहकारी संस्थांनी मिळून 'भारत टॅक्सी सेवा' नावाचा एक नवीन टॅक्सी ब्रँड तयार केला आहे. ही सेवा विशेषतः चालकांना चांगला नफा मिळवून देणे आणि प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवास सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू केली जात आहे.
ही टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी, सहकारी क्षेत्राने ३०० कोटी रुपयांचे अधिकृत भांडवल उभारले आहे. सध्या दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र चार राज्यांमध्ये २०० चालक जोडले गेले आहेत आणि ही संख्या वेगाने वाढवली जात आहे. हा संपूर्ण उपक्रम कोणत्याही सरकारी निधीशिवाय केवळ सहकारी संस्थांद्वारे चालवला जात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये ही सेवा सुरु होणार आहे.
भारत टॅक्सीसाठी वा मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या पुढाकाराने सुरू केली जात आहे, जी 6 जून रोजी अधिकृतपणे नोंदणीकृत झाली होती. त्यात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC), IFFCO, अमूल (GCMMF) सारख्या प्रमुख संस्थांचा समावेश आहे. तसेच, नाबार्ड, कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड आणि एनडीडीबी सारख्या संस्था देखील भागिदार आहेत.
या योजनेचा सर्वात मोठा उद्देश चालकांना त्यांचा योग्य वाटा देणे आहे. या सेवेचा उद्देश चालकांना अधिक उत्पन्न देणे आणि त्यांना मोठ्या कंपन्यांपेक्षा चांगले अधिकार देणे आहे. यासोबतच प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा देखील मिळेल, असा विश्वास एनसीडीसीचे उपव्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारत टॅक्सीशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सेवेसाठीचे मोबाईल अॅप डिसेंबरपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी असेही सांगितले की, या योजनेचे सुलभ टॅक्सी सेवेत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञान सल्लागार आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) - बंगळुरूचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच सर्व काही व्यवस्थित झाले तर डिसेंबरच्या अखेरीस भारत टॅक्सी जनतेसाठी सुरू केली जाईल.
लाडके भाऊ 7 तास रेल्वे स्थानकावर; रक्षाबंधनासाठी सोडणारी विशेष ट्रेन लेट