Western Railway : दंडाची रक्कम थेट स्वत:च्या बँक खात्यात, पश्चिम रेल्वेच्या टीसीविरोधात मोठी कारवाई 

सोमवारी चर्चगेट स्थानकावर तिकीट तपासणी सुरू असताना हा गैरप्रकार उघडकीस आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर प्रवाशांकडून वसूल केलेली दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याऐवजी स्वतःच्या खात्यावर वळवणाऱ्या एका टीसीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जसबीर सिंह नोत्रा असे या निलंबित टीसीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

सोमवारी चर्चगेट स्थानकावर तिकीट तपासणी सुरू असताना हा गैरप्रकार उघडकीस आला. टीसी विशाल यांनी चार प्रवाशांची तिकीट तपासणी केली होती. त्या प्रवाशांकडे मरीन लाइन्सपर्यंतचेच तिकीट असल्याने त्यांना दंड भरण्यास सांगण्यात आले. एकूण १,०२० रुपये दंड आकारण्यात आला होता.

यावेळी तिथे उपस्थित असलेले टीसी जसबीर सिंह नोत्रा यांनी प्रवाशांना दंडाची रक्कम त्यांच्या वैयक्तिक युपीआय (UPI) खात्यावर पाठवण्यास सांगितले. एका प्रवाशाने ७४० रुपये त्यांच्या खात्यावर पाठवले, तर उर्वरित रक्कम रोख स्वरूपात दिली. मात्र, पैसे घेऊनही प्रवाशांना कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नाही. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने चौकशी केली आणि जसबीर सिंह नोत्रा यांना निलंबित केले.

Advertisement

नक्की वाचा - ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी 5 मुलींच्या गप्पा रंगल्या..बाजूला बसलेल्या प्रवाशाची नियत फिरली, घाणेरड्या नजरेनं.

टीसीचा अजब दावा

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना जसबीर सिंह यांनी सांगितलं की, त्यांच्या अधिकृत रेल्वे डिव्हाइसचे चार्जिंग संपले होते, त्यामुळे त्यांनी वैयक्तिक खात्यावर पैसे घेतले. मात्र, रेल्वेच्या अधिकृत युपीआय यंत्रणा कार्यरत असतानाही वैयक्तिक खात्याचा वापर करणे आणि पावती न देणे यांमुळे रेल्वेच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा आरोप होत आहे.

प्रवाशांची लूट सुरूच?

विशेष म्हणजे, मार्च आणि ऑगस्ट २०२५ मध्येही अशाच प्रकारचे गैरप्रकार उघडकीस आले होते. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article